नागपुरात रेशनिंगचा काळाबाजार उघडकीस, १८ टन गहू-तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 05:45 PM2022-05-26T17:45:48+5:302022-05-26T17:48:23+5:30

पोलिसांनी ट्रक, गहू-तांदूळ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १५ लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला.

Black market of ration exposed in Nagpur, 18 tons of wheat and rice seized | नागपुरात रेशनिंगचा काळाबाजार उघडकीस, १८ टन गहू-तांदूळ जप्त

नागपुरात रेशनिंगचा काळाबाजार उघडकीस, १८ टन गहू-तांदूळ जप्त

googlenewsNext

नागपूर : रेशनिंगच्या धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी १८ टन गहू-तांदूळ जप्त केला आहे. हसनबागमध्ये पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकाला ताब्यात घेतले.

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नंदनवन पोलिसांना रेशनिंगचे धान्य काळाबाजार करण्यासाठी एका ट्रकमधून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शितला माता चौकाकडून हसनबाग चौकाकडे येणाऱ्या मार्गावर सापळा लावला. रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकला (एमएच ४० सीडी ७००५) थांबविण्यात आले व यशोधरानगर येथील निवासी जावेद शेख उर्फ बाबू शेख या ट्रकचालकाची चौकशी करण्यात आली.

ट्रकमध्ये गहू व तांदळाचे पोते होते. त्यांच्याबाबतचा कुठलाही कागद, बिल किंवा ऑर्डरची कॉपी जावेदकडे नव्हती. पोलिसी खाक्या दाखविल्यावर ताजबाग परिसरातून हे पोते ट्रकमध्ये भरून कळमन्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी अन्नपुरवठा विभागाला याची माहिती दिली. अन्नपुरवठा विभागाचे निरीक्षक नीलेश रोहनकर हे भरारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत ट्रकमधील मालाची पाहणी केली असता प्लास्टिकच्या २५० पोत्यांमध्ये तांदूळ असल्याचे आढळून आले.

पोलीस व भरारी पथकाने त्यानंतर ४२, शिवांगी सोसायटी, मोठा ताजबाग येथे जाऊन पाहणी केली असता तेथे धान्याची साठेबाजी केल्याचे निष्पन्न झाले. गहू व तांदळाचे वजन केले असता १२ टन तांदूळ व ६ टन गहू आढळून आले. पोलिसांनी ट्रक, गहू-तांदूळ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १५ लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला. पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, यात आणखी कोण कोण गुंतले आहे याचा तपास सुरू आहे. निरीक्षक दीपक भिताडे, उपनिरीक्षक दिलीप रहाटे, अतुल चाटे, स्वप्निल तांदुळकर, चंद्रशेखर कदम, आशिष राऊत, शरदसिंह टेंभरे यांच्या चमूने ही कारवाई केली.

Web Title: Black market of ration exposed in Nagpur, 18 tons of wheat and rice seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.