नागपुरात लॉकडाऊनमध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:58 AM2020-05-29T00:58:39+5:302020-05-29T01:00:09+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे सक्रिय झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वेतिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे सक्रिय झाले आहेत.
अशाच एका रेल्वेच्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाने जाळे टाकून अटक केली. त्याच्या जवळून ७ आरक्षण तिकिटांसह ५४ हजार ८९४ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. गुरुवारी आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ अजनीचे निरीक्षक हरिमोहन निरंजन, प्रधान आरक्षक वीरेश उपाध्याय, जवान अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. त्यानुसार बुटीबोरी येथील वैभव हाईट २ इमारतीच्या रिद्धी-सिद्धी इंटरनेटवर धाड टाकली. तेथे सापडलेल्या इसमांनी आपले नाव आनंद सदानंद (३५) रा. प्रसाद कॉलनी, बुटीबोरी सांगितले. रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ केली. त्यावर दोन पंचासमक्ष त्याचा लॅपटॉप सुरू केला असता वेगवेगळ्या सहा तिकिटांच्या बनावट आयडी मिळाल्या. तो टाळाटाळ करीत होता. त्यानंतर ७६४४ रुपयांच्या तिकिटांची प्रिंट काढण्यात आली. याबाबत कठोरपणे विचारले असता त्याने आयआरसीटीसीच्या परवान्याचा फायदा घेऊन बनावट आयडीच्या आधारे प्रवाशांकडून २०० ते ३०० रुपये कमिशन घेऊन तिकीट देत असल्याचे मान्य केले. त्यावर लॅपटॉपवर मिळालेल्या ६ आरक्षणाचे तिकीट, १ लॅपटॉप, १ प्रिंटर, रोख १२५० सह ५४ हजार ८९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आरोपीला अजनी ठाण्यात आणून रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.