अवैध रिफिलिंग सेंटरमधून सुरू होती गॅस सिलिंडरची काळाबाजारी
By योगेश पांडे | Updated: April 8, 2025 22:43 IST2025-04-08T22:42:15+5:302025-04-08T22:43:08+5:30
एजन्सीमधील डिलिव्हरी कर्मचारीच करत होते रिफिलिंग : घरगुती सिलिंडरमधून काढत होते १ ते २ किग्रॅ गॅस

अवैध रिफिलिंग सेंटरमधून सुरू होती गॅस सिलिंडरची काळाबाजारी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करून काळाबाजारी करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला. नारी परिसरातील अवैध रिफिलिंग सेंटरवर धाड टाकत पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. एका गॅस एजन्सीमधील डिलिव्हरी कर्मचारीच हा प्रकार करत होते. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.
मोहनसिंग जगदीशसिंग (२४, सिलावट, ढोलपूर, राजस्थान) व विष्णुकुमार कुलदीपसिंग रेहार (२२, सिलावट, ढोलपूर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नारी मार्गावरील दीपक टायर चौकातील प्लॉट क्रमांक ४९ येथे भाड्याने राहायचे. तेथेच ते रिफिलिंगचे रॅकेट चालवत होते. दोन्ही आरोपी सिव्हिल लाइन्स येथील डोमेस्टिक गॅस एजन्सीत कार्यरत होते व डिलिव्हरी करायचे. ते घरगुती वापराच्या एचपी सिलिंडरमधून नोझलच्या सहाय्याने निळ्या रंगाच्या कमर्शियल सिलिंडरमध्ये अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करायचे. पोलिसांना याची माहिती कळाली असता सोमवारी पावणेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी तेथे धाड टाकली. दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. घरगुती वापराच्या प्रत्येक सिलिंडरमधून ते एक ते दोन किलोग्रॅम गॅस कमर्शियल सिलिंडरमध्ये भरायचे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एचपी कंपनीचे १७ गॅस सिलिंडर, भारत कंपनीचे ७ गॅस सिलिंडर, इंडेन गॅस कंपनीचा १ कमर्शियल सिलिंडर, २ ट्रान्सफर नोझल असा ३.७६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
सिलिंडरच्या वजनाची करा तपासणी
एकीकडे एलपीजी सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. तर, दुसरीकडे शहरात नियमितपणे अवैध रिफिलिंगचे प्रकार समोर येत आहेत. गॅस सिलिंडरमध्ये गोलमाल करून ग्राहकांना चुना लावला जात आहे. त्यामुळेच घरी गॅस सिलिंडर आल्यावर त्याच्या वजनाची तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. तशी सूचनाच डिलिव्हरी स्वीकारताना कर्मचाऱ्यांना करून डोळ्यासमोर वजन तपासून घेणे गरजेचे आहे.