विदर्भाच्या धानपट्ट्यात पिकतोय कॅन्सरवर मात करू शकणारा काळा तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:07 AM2019-09-19T11:07:48+5:302019-09-19T11:10:13+5:30

नागपुरातील आत्मा प्रकल्पाने एक नवा प्रयोग केलाय. कॅन्सरवर मात करू शकणाऱ्या काळ्या तांदळाच्या वाणाची लागवड सेंद्रीय शेती बचत गटांच्या माध्यमातून केली आहे.

Black rice that can overcome cancer growing in Vidarbha's paddy fields | विदर्भाच्या धानपट्ट्यात पिकतोय कॅन्सरवर मात करू शकणारा काळा तांदूळ

विदर्भाच्या धानपट्ट्यात पिकतोय कॅन्सरवर मात करू शकणारा काळा तांदूळ

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी क्रांतीचे नवे पाऊल नागपूर आत्मा प्रकल्पाचा पुढाकार

गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील आत्मा प्रकल्पाने एक नवा प्रयोग केलाय. कॅन्सरवर मात करू शकणाऱ्या काळ्या तांदळाच्या वाणाची लागवड सेंद्रीय शेती बचत गटांच्या माध्यमातून केली आहे. विदर्भाच्या धान पट्ट्यात कृषी क्रांती घडवू पहाणारे हे पाऊल ठरणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग नागपुरात करण्यात आला आहे.
उत्पादनाचे हे दुसरे वर्ष असून नागपूर जिल्ह्यात यंदा १२७ एकरवर हा तांदूळ पिकविला जात आहे. इंदिरा गांधी कृषी विश्व विद्यालयाअंतर्गत अभ्यास दौºयावर असताना नागपूर आत्माच्या प्रकल्प अधिकारी नलिनी राठोड यांना शेतकऱ्यांकडून या तांदळाबद्दल माहिती मिळाली. नागपूर प्रकल्पात याचे उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी ७०० किलो धानबिजाई मागविली. २०१८ मध्ये उमरेड, रामटेक, कामठी, मौदा, पारशिवनी, कुही आणि भिवापूर या सात तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या शेतकºयांच्या सेंद्रीय गटांना ही बिजाई प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी दिली. १० शेतकºयांचा मिळून १० एकराचा एक गट यानुसार ७० एकरामध्ये याची लागवड झाली. पहिल्याच वर्षी १२५ दिवसात एकरी १२ ते १५ क्विंटलचे उत्पादन आले.
नवीन तांदूळ असल्याने त्याच्या विक्रीचा प्रश्न होता. नागपुरात झालेल्या कृषी महोत्सवातून राठोड यांनी हा प्रश्न तात्पुरता सोडविला. २०० रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री झाली. नागपुरातून हा तांदूळ चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पोहचला. अनेकांनी संबंधित शेतकºयांचे संपर्क क्रमांक मिळवून गटांकडून बिजाई खरेदी केली. यावर्षी नागपूर आत्मा प्रकल्पाकडून ९० एकरावर या धानाची लागवड करण्यात आली आहे. सोबतच ३७ शेतकºयांनीही पुढाकार घेऊन लागवड केली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनीही या उपक्रमाची दखल घेतली असून विदर्भ व मराठवाडा विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

काय आहे काळा तांदूळ
हा तांदूळ सर्वसाधारण तांदळासारखा असला तरी रंगाने काळा आहे. या तांदळाचे उत्पादन पूर्वी चीनमध्ये केवळ राजपरिवाराच्या वापरासाठी होत असे. सर्वसामान्यांना मज्जाव असल्याने ‘फॉरबिडन राईस’ अशीही त्याची पाश्चात्त्य देशात ओळख आहे. कालांतराने तो अमेरिका, आस्ट्रेलिया, युरोपमध्ये व नंतर उत्तर-पूर्व भारतात आला.

कृषी विज्ञान केंद्राकडे दस्तऐवज उपलब्ध
जर्मनीमध्ये या तांदळावर संशोधन झाले असून यात कॅन्सर प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. हा तांदूळ रोगप्रतिकारक असून शरीरातील विषारी द्रव्ये नाहीशी करतो. पचण्यास हलका असून बद्धकोष्ठता कमी करतो. मधुमेह, लठ्ठपणा यावरही तो गुणकारी असल्याचे संशोधनासंदर्भातील जर्मनीतील दस्तऐवज कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहेत.

काळ्या तांदळाच्या लागवडीचे हे दुसरे वर्ष आहे. पूर्णत: सेंद्रीय पद्धतीने तो शेतकरी गटांच्या माध्यमातून पिकविला जात आहे. या तांदळाला बाजारपेठ उपलब्ध झाल्यास धान उत्पादकांच्या जीवनात नवी क्रांती होईल.
- नलिनी राठोड, प्रकल्प अधिकारी, आत्मा नागपूर

नैसर्गिक खाद्यान्नामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे अनेक घटक असतात. प्रत्येक खाद्यान्नाचे गुणधर्मही वेगवगळे असतात. काळ्या तांदळामुळे कॅन्सरवर मात करता येते का, यावर संशोधन सुरू आहे. या संदर्भातील पुढील संशोधनाची माहिती अद्यापपर्यंत आमच्याकडे आलेली नाही.
- डॉ. सुशील मानधनिया,
कॅन्सरतज्ज्ञ, नागपूर

काळ्या तांदळाचे उत्पादन शेतकºयांना आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. मागील वर्षी आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून लागवड व विक्री केली होती. विदर्भ-मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत या तांदळाच्या लागवडीसाठी प्रायोगिक तत्त्वावर सहभाग केला आहे.
- अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर

Web Title: Black rice that can overcome cancer growing in Vidarbha's paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती