नागपूर जिल्ह्यात ब्लॅक बक हरणाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:23 AM2018-06-20T10:23:10+5:302018-06-20T10:23:18+5:30
मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे वन विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नागपुरातील तीन संशयित युवकांना चौकशीसाठी बोलाविले आहे. यात रियाज अहमद अब्दुल वहाब अन्सारी (३५) लष्करीबाग, मोहम्मद आसिफ अन्सारी (३६) मोमीनपुरा, रियाज अहमद मो. जिया (३५) मोमीनपुरा यांचा समावेश आहे. हे तीन युवक घटनेच्या परिसरात फॉर्च्युनर गाडी क्रमांक एमएच ३१-सीएक्स-७००० ने संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता नगरधन शिवारात दिलीप रंगारी यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर काळवीट मृतावस्थेत आढळले होते. हरणाच्या पायावरच्या भागात गोळी लागली होती. हरणाच्या शिकार प्रकरणात माहिती मिळाल्यावर सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे व रामटेक वन परिक्षेत्राचे आरएफओ एस.डी. खोब्रागडे घटनास्थळावर पोहचले. त्यांनी स्थानिक लोकांशी विचारणा केली असता, तीन युवक सोमवारी रात्री गावात फिरताना आढळले. या युवकांना किडनी चोर समजून त्यांना मारपीट करून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींना विचारपूस केल्यावर सोडून दिले. सकाळी शिवाराजवळ हरणाची शिकार झाल्याची घटना घडल्यामुळे युवकांवर संशय वाढला आहे.
रात्री झाली मारपीट
स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार, सोमवारी रात्री १० वाजता शिवाराजवळ गाडी लावून सात ते आठ युवक हातात टॉर्च घेऊन काही तरी शोधत होते. त्यांचे संशयास्पद कृत्य बघून हे युवक चोरटे आहेत, असा संशय स्थानिक नागरिकांना आला. त्यांनी मानापूर, उदापूर व नगरधन येथील लोकांना मोबाईलद्वारे कळविले. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन तीन युवकांना मारपीट केली. हे बघून अन्य पाच जण पळून गेले. लोकांनी त्यांना मारपीट केल्यानंतर हे युवक हरीण पकडण्यासाठी आल्याची त्यांनी माहिती दिल्याचे समजते.