‘ब्लॅकलिस्टेड’ कंपनीच बनविणार सिमेंट रोड !
By admin | Published: June 27, 2016 02:51 AM2016-06-27T02:51:23+5:302016-06-27T02:51:23+5:30
शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निविदा भरणाऱ्या मे. अभि इंजिनिअरिंगला नागपूर महापालिकेने दोन
नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निविदा भरणाऱ्या मे. अभि इंजिनिअरिंगला नागपूर महापालिकेने दोन पॅकेजचे काम दिले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ताहीन काम केल्याच्या मुद्यावरून मुंबई महापालिकेने या कंपनीसह चार कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्टेड’ (काळ्या यादीत टाकले) केले आहे. या कंपनीची प्रतिमा मलिन असल्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत ताशेरे ओढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासनाने कायदेशीर सल्ला घेतला व त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला काम देण्यावर एकमत झाले. आता २७ जून रोजी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणाऱ्या या प्रस्तावात उल्लेख आहे की, अभि इंजीनियरिंग कार्पोरेशनमध्ये १ आॅक्टोबर २००४ पासून २ सप्टेंबर २०१३ पर्यंत एकूण ७ भागीदार फर्म होत्या. भागीदारीची मुदत संपल्यामुळे आता मे. अभि इंजीनियरिंग कार्पोरेशन प्रा. लिमिटेड नावाने कंपनी बनविण्यात आली आहे. कंपनीची तशी नोंदणीही करण्यात आली आहे.
मे. अभि इंजीनियरिंग कार्पोरेशन नागपूर ची राज्याच्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातही नोंदणी आहे. याची वैधता २८ आॅगस्ट २०१६ पर्यंत आहे. संबंधित कंपनीने ५ सप्टेंबर २०१५ रोजी महापालिकेत वर्ग १ कंत्राटदार म्हणून नोंदणी केली आहे. मिळालेल्या कायदेशीर सल्ल्यात असे नमूद आहे की, कंपनीने नियमानुसार निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. कंपनीवर लागलेले आरोप योग्य नाहीत. एक प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कंत्राटदाराकडून हमीपत्र घेतले जाईल. काही अटींवर संबंधित कंत्राटदाराला काम देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
संबंधित कंपनीला सीमेंट काँक्रिट रोड टप्पा- २ च्या पॅकेज २ अंतर्गत दक्षिण अंबाझरी रोड ते माटे चौक व अंबाझरी टी पॉर्इंट ते मंगलमूर्ती चौक ते शीतला माता मंदिर पर्यंत, आरपीटीएस ते माधवनगर चौक मार्गे वेस्ट हाईकोर्ट रोड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम १७.४६ कोटी रुपयांमध्ये दिले आहे. त्याचप्रकारे पॅकेज- १ अंतर्गत दक्षिण अंबाझरी रोड ते वर्धा रोड मार्गे रहाटे कॉलनी टी पॉर्इंट ते माटे चौकापर्यंत सीमेंट रोडसाठी ११.६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. (प्रतिनिधी)
चिंचभुवन, हुडकेश्वर, नरसाळासाठी टीपी स्कीम
मौजा चिंचभुवन, मौजा हुकेश्वर व मौजा नरसाळा येथील भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेने टीपी स्कीम (नगर विकास योजना) लागू करण्याची तयारी केली आहे. नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५९ ते ११२ अंतर्गत नगर रचना प्रकल्पाची टीपी स्कीम तयार करण्यात आली आहे. संबंधित भागात टीपी स्कीमच्या अंमलबजावणीवर अभ्यास करण्यासाठी अनुभवी तांत्रिकी तज्ज्ञाची नियुक्ती केली जाईल. यासाठी १.५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.