नागपुरात कोचिंग क्लासच्या शिक्षकाकडून ब्लॅकमेलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:37 AM2018-11-25T00:37:11+5:302018-11-25T00:38:07+5:30
स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे.
धंतोलीतील जानकी कॉम्प्लेक्सच्या दुसºया माळ्यावर बी. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूट नामक स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लास आहे. तेथे भुसारी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो वर्गात येणाऱ्या विद्यार्थिनींसोबत एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने फेसबुक फ्रेण्डशिप करायचा. त्यांच्यासोबत स्वत:चे फोटो काढून घ्यायचा आणि नंतर ते फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्याचा धाक दाखवून त्यांचा विनयभंग करायचा. पीडित महिला बँकेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी येथे येत होती. आरोपी भुसारीने तिच्यासोबत असेच फोटो काढून नंतर तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तो तिच्यासोबतचे फोटो पतीला पाठवीन तसेच व्हायरल करेन, अशी धमकी देऊ लागला. त्याचे ब्लॅकमेल करणे सुरू असताना हा प्रकार तिच्या पतीला माहीत पडला. त्यानंतर महिलेने धंतोली ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग तसेच आयटी अॅक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.
अन्य मुलींसोबतही गैरवर्तन
आरोपी राहुल भुसारीने महिलेसारखेच अन्य विद्यार्थिनींसोबतही गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थिनीच्या असहायतेचा तो गैरफायदा उचलत होता, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.