लहान मुलांनीच केले मित्राला ब्लॅकमेल
By admin | Published: January 7, 2016 03:43 AM2016-01-07T03:43:17+5:302016-01-07T03:43:17+5:30
एका शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षिका आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याच्या मुलांनी मिळून ....
१० हजार रुपये उकळले : पोलिसांनी सावधगिरीने हाताळले प्रकरण
नागपूर : एका शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षिका आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याच्या मुलांनी मिळून एका आर्किटेक्टच्या मुलाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित मुलाचे वडील गडचिरोली येथे आर्किटेक्ट आहेत. ते आपल्या परिवारासह सोनेगाव परिसरातील उज्ज्वलनगर येथे राहतात. त्यांचा मुलगा हा शहरातील एका नामांकित शाळेत शिकतो. परिसरात राहणारे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी, एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेच्या मुलांशी त्याची मैत्री आहे. हे चारही जण १२ ते १५ वर्ष वयोगटातील असून सातवी ते बाराव्या वर्गात शिकतात. काही दिवसांपूर्वी आर्किटेक्टच्या मुलाने मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी वडिलांच्या खिशातून ५०० रुपये काढले.
त्याची माहिती त्याच्या तीन मित्रांना मिळाली. त्यानंतर इतर तिघांनी संगनमत करून या मुलाला धमकावले. वडिलांना सांगण्याची धमकी दिली. तसेच न सांगण्यासाठी ५ हजार रुपये आणण्यास सांगितले. त्यावेळी आई-वडिलांच्या भीतीमुळे त्याने आईच्या पर्समधून ५ हजार रुपये काढून मित्रांना दिले. थर्टी फर्स्टच्या दिवशी पुन्हा त्यांनी आर्किटेक्टच्या मुलला धमकावून ५ हजार रुपये आणण्यास सांगितले. त्याने पुन्हा आईच्या पर्समधून पैसे काढून त्यांना दिले. दोन वेळा घरातून पैसे चोरीला गेल्याने आर्किटेक्टच्या पत्नीने मुलाची चौकशी केली.
तेव्हा त्याने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. त्या मुलांनी मंगळवारी पुन्हा १० हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा मुलाने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी थेट गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणातील सर्व मुले ही चांगल्या घरची असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी सावधगिरीने प्रकरण हाताळले.
तिन्ही मुलांना आई-वडिलांसह बोलावून घेतले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही त्यांच्या पालकांसमोर समज देऊन सोडून दिले.(प्रतिनिधी)