लाईव्ह सेक्सचे प्रलोभन दाखवून ब्लॅकमेलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:12 AM2021-03-13T04:12:01+5:302021-03-13T04:12:01+5:30
योगेंद्र शंभरकर नागपूर : वर्तमान काळात सायबर गुन्हे सर्वत्र वाढत असल्यामुळे फेसबुकवर अज्ञात युवक-युवतीसाेबत मैत्री करणे महागात पडू शकते. ...
योगेंद्र शंभरकर
नागपूर : वर्तमान काळात सायबर गुन्हे सर्वत्र वाढत असल्यामुळे फेसबुकवर अज्ञात युवक-युवतीसाेबत मैत्री करणे महागात पडू शकते. सध्या दिल्ली व गुडगाव येथील सायबर गुन्हेगारांची टोळी योजनाबद्ध पद्धतीने महिला व पुरुषांची फसवणूक करीत आहे. सुरुवातीला अज्ञात युवती मैत्री करण्याची विनंती पाठवून रात्री फोनवर बोलायला लागते. एक-दोन दिवसानंतर ती अश्लील वागणे सुरू करते. पुरुष त्याविषयी उत्साही दिसल्यास ती थेट लाईव्ह सेक्सची ऑफर देऊन स्वत:चे अश्लील व्हिडिओ शेयर करते. त्यानंतर पुरुष मित्रानेही तसेच केल्यास त्याला ब्लॅकमेल केले जाते. काही दिवसांपूर्वी असेच एक प्रकरण पुढे आले. शहरातील एका प्रतिष्ठित शाळेच्या ४० वर्षीय शिक्षकाला गेल्या सात दिवसापासून ब्लॅकमेल केले जात आहे.
शिक्षक रमाकांत (बदललेले नाव) याची पत्नी व मुले भिलाईत राहतात. त्याला १ मार्च रोजी दिल्ली येथील पूनम नामक युवतीने फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली. ती विनंती स्वीकारताच पूनमने रमाकांतसोबत मॅसेंजरवर संपर्क साधला. तसेच, दुसऱ्या दिवशी व्हॉटस्ॲपवर अश्लील बोलायला सुरुवात केली. तिने स्वत:चे अश्लील फोटो पाठवून रमाकांतलाही तसेच फोटो मागितले. रमाकांतने फोटो पाठवताच पूनमने ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १० हजार रुपयाची मागणी केली.
-----------------
व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्याची धमकी
सायबर गुन्हेगारांच्या टोळीने रमाकांतचा अश्लील व्हिडिओ त्याच्या परिचितांना पाठविण्याची व यूट्यूबवर टाकण्याची धमकी देऊन त्याच्याकडून आतापर्यंत सव्वालाख रुपये वसूल केले आहेत. त्याला धमकीचे कॉल करणे व एसएमएस पाठविणे सुरूच आहे. रमाकांतने पोलीस व सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
------------------
दिल्ली सायबर क्राईम सेलचा फोन
रमाकांतला ४ मार्च रोजी ९७०७४६७०१८ क्रमांकावरून फोन आला. पुढच्या व्यक्तीने तो दिल्ली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम मल्होत्रा बोलत असल्याचे सांगितले. तसेच, रमाकांतचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आल्याची व संबंधित युवतीने तक्रार केल्याची माहिती दिली.
--------------
युवतीजवळ आढळले ड्रग्ज
मल्होत्राने ८ मार्च रोजी रमाकांतला दुसऱ्यांदा फोन करून पूनमजवळ मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळल्याची माहिती दिली. तसेच, पूनमने रमाकांतकडून ड्रग्ज घेतल्याची कबुली दिल्याचे सांगितले व प्रकरण दाबण्यासाठी ३० हजार रुपयाची मागणी केली. त्यामुळे रमाकांतची झोप उडाली आहे.
---------------
एनजीओनेही दिली तक्रार
ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष सचिन बिसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एनजीओच्या सदस्यांनाही पूनम व फिलोमिना नाम युवतीने फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली होती. त्या दोघी फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यामुळे सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली. परंतु, पुढे काहीच कारवाई झाली नाही.
----------------
सायबर गुन्हेगारांपासून सावधान राहा
कोणत्याही बनावट वेबसाईटचा उपयोग आणि अज्ञात व्यक्तीसोबत मैत्री करणे धोकादायक ठरू शकते. असे केल्यास फसवणूक होऊ शकते. सायबर सेल यासंदर्भात नियमित जनजागृती करीत आहे. नागरिक यूट्यूबवर संबंधित वेबिनार पाहून स्वत:चे संरक्षण करू शकतात. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावधान राहावे. फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांसोबत संपर्क करावा.
----- डॉ. अशोक बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर सायबर सेल.