यंत्रणा दावणीला बांधून ब्लॅकगोल्डचे ब्लॅकमार्केटिंग; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोलमाफियांचे वारेन्यारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 07:00 IST2021-10-20T07:00:00+5:302021-10-20T07:00:11+5:30
Nagpur News कोळसा टंचाईची सर्वत्र ओरड होत असताना नागपूर - विदर्भातील कोलमाफियांनी कोळशाच्या नावाखाली दगड, गिट्टीची विक्री चालवली असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे.

यंत्रणा दावणीला बांधून ब्लॅकगोल्डचे ब्लॅकमार्केटिंग; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोलमाफियांचे वारेन्यारे
नरेश डोंगरे
नागपूर : कोळसा टंचाईची सर्वत्र ओरड होत असताना नागपूर - विदर्भातील कोलमाफियांनी कोळशाच्या नावाखाली दगड, गिट्टीची विक्री चालवली असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. कोळशाची राजरोसपणे तस्करी करणाऱ्या कोलमाफियांनी अवघी यंत्रणाच दावणीला बांधली की काय, अशी शंका या गोरखधंद्यातून घेतली जात आहे. कारण कोलमाफियांकडून चालविल्या जाणाऱ्या रॅकेटमध्ये खाणीतील काही भ्रष्ट अधिकारी, संबंधित ठिकाणचे पोलीस आणि कारवाईचा अधिकार असलेल्या विभागाचे काही भ्रष्ट अधिकारीही सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोळशाच्या व्यवहारातून रोज कोट्यवधींची हेरफेर करणारी ही मंडळी आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे कोळसा टंचाईमुळे वीज संकट गडद होत आहे. दुसरीकडे कोळशावर आधारित अनेक उद्योगांना कोळसा मिळत नसल्याने संबंधित उद्योग अडचणीत आले आहे. आपले उद्योग वाचविण्यासाठी आणि संभाव्य संकटावर मात करण्यासाठी संबंधित कारखानदार पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहेत. त्याचा फायदा घेत कोलमाफिया आणि काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने कोळशाची जोरदार ब्लॅकमार्केटिंग चालविली आहे.
नागपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कन्हान, सिंगोरी, बोंडेगाव, भानेगाव आणि उमरेड खाणीतून कोळसा येतो. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातही कोळशाच्या अनेक खाणी आहेत. यासह महानदी कोल फिल्ड लिमिटेड (एमसीएल), साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (एसईसीएल) आणि सिंगोरानी कोलफिल्ड लिमिटेड (एससीएल) या छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील खाणीतूनही कोराडी, खापरखेडा प्लान्टसाठी नियमित कोळसा येतो. यातील ट्रकचालक आणि क्लिनर तसेच या ट्रकची रखवाली करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याशी संगणमत करून कोलमाफिया त्यांच्या हातात नोटा कोंबतात किंवा त्यांना धाक दाखवून मध्येच आपल्या ठिय्यावर नेतात. कोलमाफियांनी तयार केलेल्या टोळ्यांमधील गुंड आणि रोजीरोटीच्या शोधात आपला प्रांत सोडून आलेली मजूर मंडळी ट्रकमधील कोळसा मध्येच खाली करतात. त्या बदल्यात ट्रकमध्ये दगड, गिट्टी आणि चुरा भरला जातो.
संबंधित यंत्रणा शांत का?
विशेष म्हणजे, कोळसा तस्करी, लोडिंग अनलोडिंग आणि भेसळीचे अनेक ठिय्ये नजरेत येण्यासारखे असूनही तस्करीला आळा घालण्याची किंवा कोळशात दगड, गिट्टीची भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहेत, ते गप्प का बसलेत, असा प्रश्न आहे. हा प्रश्न अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. कोळसा चोरी, भेसळ आणि तस्करीचा पुढचा टप्पा जास्तच अचंबित करणारा आहे.
-----