हातात ब्लेड, गळ्याला फास, टॉवरवरचे ‘ते’ चार तास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:45 PM2020-08-08T23:45:44+5:302020-08-09T00:12:27+5:30
हातात ब्लेड आणि दोर घेऊन तो १५० फूट उंच हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढला. शिड्यांना दोराने फास लावून वर बसला. काही क्षणात पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने अग्निशमन दलही दाखल झाले. तर तो काही जुमानेना. उतरविण्याचा प्रयत्न केला तर त्याने ब्लेडने हाताची नस कापली. जबरदस्ती केली तर गळ्यात लावलेल्या दोराने गळफास घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. तब्बल चार तास हे थरारक नाट्य आकाशवाणी चौकात चालले होते आणि श्वास रोखून सगळेच पाहत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हातात ब्लेड आणि दोर घेऊन तो १५० फूट उंच हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढला. शिड्यांना दोराने फास लावून वर बसला. काही क्षणात पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने अग्निशमन दलही दाखल झाले. तर तो काही जुमानेना. उतरविण्याचा प्रयत्न केला तर त्याने ब्लेडने हाताची नस कापली. जबरदस्ती केली तर गळ्यात लावलेल्या दोराने गळफास घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. तब्बल चार तास हे थरारक नाट्य आकाशवाणी चौकात चालले होते आणि श्वास रोखून सगळेच पाहत होते.
आकाशवाणी चौकातील हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढलेल्या एका तरुणाने शनिवारी चांगलीच खळबळ उडवली. टॉवरवर दारू पिऊन चढलेल्या तरुणाने तेथेच गळ्याला फास लावला होता आणि सोबत नेलेल्या ब्लेडने हाताची नसही कापली असल्याने रक्त वाहत होते. ३८ ते ४० वयोगटातील असलेला हा व्यक्ती कौटुंबिक कारण व कुठल्या तरी कर्जाच्या प्रकरणामुळे आत्महत्येच्या विचाराने चढल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचे नाव मनोज असल्याचे सांगण्यात येत आहे. तो टॉवरच्याच कंपनीत अभियंता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सध्या बेरोजगार झाला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आकाशवाणी चौकातील हायमास्ट टॉवरवर तो चढला. लोकांना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्याबाबत माहिती मिळताच जवळपास ७.३० वाजताच्या दरम्यान पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले.
टॉवरच्या भोवताल ‘नेट’
चौकात टॉवरच्या भोवताली पोलिसांनी गराडा घातला हेता. तो खाली उडी घेईल, या शक्यतेने टॉवरच्या भोवताल नेट लावण्यात आली. दरम्यान, अग्निशमन विभागाकडे असलेल्या उंच टीटीएलच्या मदतीने पोलीस जवान समजविण्यासाठी तरुणापर्यंत पोहचले. त्यावेळी तरुणाने टॉवरच्या शिड्यांना दोर बांधून गळ्यात फास लावून असल्याचे आणि त्याच्या हातात ब्लेड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला पकडायला गेले तेव्हा त्याने स्वत:च्या हातावर ब्लेडने सपासप वार केले. त्यामुळे पोलीस जवानांचीही तारांबळ उडाली. मग त्याची विचारपूस करून समजाविण्याचा प्रयत्न चालला. पथकातील एका जवानाने दिलेल्या माहितीनुसार टॉवरवर चढण्याचे कारण विचारले असता, अनेक कारणाने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले.
त्याने कुठून तरी कर्ज घेतले होते आणि फेडलेही होते. मात्र एका मित्राने त्याची फसवणूक करून आणखी कर्ज मनोजच्या नावावर चढविल्याचे तो सांगत होता. त्याला पत्नी तसेच मुलगा व मुलगी आहे. पण कौटुंबिक कारणाने पत्नी मुलांसह त्याला सोडून गेल्याचेही त्याने सांगितले.
सगळ्यांचीच उडवली भंबेरी
पथकाने त्याला समजावून खाली उतरविण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास गळफास घेण्याची धमकी देत असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. जवळपास चार तास हे नाट्य सुरू होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. रात्री जवळपास १०.३० च्या सुमारास बरेच प्रयत्न करून मनोजला पकडण्यात आणि खाली उतरविण्यात पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नंतर त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले.