नागपुरातील स्फोट, अन् गडकरींची संवेदनशीलता; स्वागत रॅली केली रद्द
By योगेश पांडे | Published: June 13, 2024 08:18 PM2024-06-13T20:18:42+5:302024-06-13T20:19:20+5:30
गडकरी यांनीच यासंदर्भात आवाहन केले होते.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अमरावती मार्गावरील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातील जीवहानीनंतर राजकीय वर्तुळातूनदेखील शोक व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नागपुरात परत येत असल्याने नितीन गडकरी यांची गुरुवारी भव्य स्वागत रॅली निघणार होती. मात्र या स्फोटामुळे ती रॅली रद्द करण्यात आली. गडकरी यांनीच यासंदर्भात आवाहन केले होते.
गडकरी यांच्या स्वागतासाठी सायंकाळी पाच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावरून भव्य रॅली निघणार होती. त्यासंदर्भात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आले होते. मात्र या स्फोटाची बातमी कळताच गडकरी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला व स्वागत उत्सव स्थगित करावा असे आवाहन केले. या स्फोटात कामगारांचा मृत्यू झाल्याची बाब दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मृतक व जखमींच्या शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे हीच प्रार्थना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार : फडणवीस
या स्फोटाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिस आयुक्तांशी मी संपर्कात असून, जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.