नागपूर जिल्ह्यातील मानस अॅग्रो प्रा.लि. या साखर कारखान्यात ब्लास्ट; वेल्डरसह पाच कामगारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:35 PM2020-08-01T16:35:07+5:302020-08-01T18:38:41+5:30
नागपूर: जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करित असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बायोगॅस प्रकल्पात गॅसवेल्डींगने डागडुजी करीत असतानाच स्फोट झाल्याने पाच कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मृतांमध्ये मंगेश प्रभाकर नौकरकर (२३), वासुदेव विठ्ठल लडी (३४), लीलाधर वामन शेंडे (४६), सचिन प्रकाश वाघमारे (२७), प्रफुल्ल पांडुरंग मून (२५) सर्वच रा. वडगाव ता. उमरेड अशा एकूण पाच कामगारांचा समावेश आहे. पूर्वाश्रमीच्या पूर्ती साखर कारखान्यातील ही घटना असून पाचही कामगार एकाच गावातील शेजारीच वास्तव्याला होते. यामध्ये सचिन वाघमारे हा वेल्डर होता.
बेला येथे मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅस मोलॅसिस उत्पादन टँक आहे. ही टँक ६० लाख लिटर क्षमतेची असून उसाच्या मळीपासून सेंट वॉश पदार्थ काढला जातो. त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. विद्युत निर्मितीसाठी हा बायोगॅस उपयोगी ठरतो.
सहा महिन्यापासून या ठिकाणी काम बंद होते. कारखान्यात मेंटेनन्सचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. या कामाचे कंत्राट संजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे पाच कंत्राटी कामगार कामावर आले. सदर बायोगॅस प्रकल्पात वेल्डींगच्या माध्यमातून डागडुजीचे कार्य सुरू होते. अशातच बायोगॅसचा स्फोट झाला. पाचही कामगारांचे मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत होते. दोन कामगारांचे प्रेत टँकच्या खाली पडले तर अन्य तीन कामगारांचे मृतदेह टँकच्या परिसरात दिसून आले. शेवटच्या टप्प्यातच काम सुरू असताना हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत केली जावी, अशी वडगाव येथील नागरिकांची मागणी आहे.
पोलीस अधीक्षक स्पॉटवर
बेला येथील घटनेची माहिती कळताच नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ, प्रभारी पोलीस निरीक्षक राजश्री पाटील आदींसह पोलीस ताफा होता. वृत्त लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता. योग्य तपासाअंती नियमानुसार कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.
बेला, वडगाव हादरले
बेला येथून केवळ एक किलोमीटर अंतरावर वडगाव आहे. या ठिकाणी सुमारे १२५ घरांची वस्ती असून, पाचही मृत शेजारीच होते. यामुळे सोबतच कंपनीत जाणे-येणे असायचे. पाचही कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले आहेत. एकाच गावातील पाच जणांचा असा हकनाक बळी गेल्याने वडगाव, बेला हादरले.