नागपुरात बेसमेंटच्या खोदकामासाठी ब्लास्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:07 AM2019-12-11T00:07:28+5:302019-12-11T00:08:38+5:30

शंकरनगर चौक ते रामनगर चौकादरम्यान असलेल्या निर्माणाधीन व्यावसायिक इमारतीच्या बेसमेंटच्या खोदकामासाठी रोज ब्लास्टिंगचा वापर होत आहे. बांधकामामध्ये स्फोटके वापरण्याच्या कंत्राटदाराच्या या प्रकारामुळे नागरिकही चक्रावले आहेत.

Blasting for basement excavation in Nagpur | नागपुरात बेसमेंटच्या खोदकामासाठी ब्लास्टिंग

नागपुरात बेसमेंटच्या खोदकामासाठी ब्लास्टिंग

googlenewsNext
ठळक मुद्देपरिसरातील नागरिकही चक्रावले : मनपा आयुक्तांसह पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंकरनगर चौक ते रामनगर चौकादरम्यान असलेल्या निर्माणाधीन व्यावसायिक इमारतीच्या बेसमेंटच्या खोदकामासाठी रोज ब्लास्टिंगचा वापर होत आहे. बांधकामामध्ये स्फोटके वापरण्याच्या कंत्राटदाराच्या या प्रकारामुळे नागरिकही चक्रावले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या गंभीर प्रकाराबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त आणि नगर रचना विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंगच्या नियोजित कामासाठी मागील काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. मात्र याकामी संबंधित कंत्रााटदार स्फोटकांचा वापर करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. बेसमेंटचे खोदकाम करताना रोज ब्लास्ट करण्याचा आवाज येतो. या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरातील भांडी पडली, हादरे बसणे असे प्रकार सुरू झाले. कलश एनक्लेव्ह अपार्टमेंटमधील नागरिकही याच समस्येमुळे सध्या त्रस्त आहेत. कलश एनक्लेव्हच्या मागील बाजूस असलेल्या मलिका अपार्टमेंटच्या मागेच हे खोदकाम सुरू आहे. या स्फोटामुळे आपल्या इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ शकतात, असे कलश एनक्लेव्हमधील नागरिकांचे म्हणणे आहे.
अगदी शहराच्या मध्य वस्तीत आणि निवासी वसाहत असलेल्या भागात या बांधकामातील खोदकामासाठी स्फोटके वापरण्याची परवानगी या कंत्राटदाराला कुणी दिली, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. याप्रकरणी नागरिकांनी मनपा आयुक्त, नगर रचना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे.
ब्लॉस्टिंग संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित बिल्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही.

हादऱ्यांमुळे नागरिकाना चिंता
या ब्लॉस्टिंगमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. हितेश पारीख यांनीही चिंता व्यक्त केली. ब्लॉस्टनंतर घरातील भांडी उसळून पडतात. यामुळे इमारतीला धोका पोहचण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरात ब्लॉस्टची परवानगी नसतेच !
मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, शहराच्या मध्य वस्तीत कोणत्याही प्रकारच्या खोदकामासाठी ब्लॉस्टिंगची परवानगी दिली जात नसते. तसे आवश्यकच असेल तर आजूबाजूच्या नागरिकांचे ना हरकत पत्र आवश्यक असते. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, एखाद्या विशिष्ट प्रकरणातच पोलीस आणि महसूल विभागाची परवानगी यासाठी दिली जाते. मात्र ब्लॉस्टिंग करताना अग्निशामक दल, आगीचा बंब यांची नियमानुसार शुल्क भरून ते तयार ठेवावे लागतात, तरच परवानगी मिळते. मागील अनेक वर्षात शहरात ब्लॉस्टिंगसाठी कुणीही परवानगी मागितलेली नाही. काही महिन्यांपूर्वी केवळ एका बिल्डरने परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर निर्णय झाला नाही.

झोन स्तरावर कारवाई होणार
मनपा नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे म्हणाले, आपला विभाग थेट कारवाई करू शकत नाही. मात्र संबंधित अपार्टमेंटमधील नागरिकांनी त्यांच्या झोनमध्ये तक्रार नोंदवावी. त्यावर झोन स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Blasting for basement excavation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.