यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाच्या संशोधनावर जर्मनीची मोहोर
By admin | Published: October 28, 2014 12:27 AM2014-10-28T00:27:35+5:302014-10-28T00:27:35+5:30
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेल्या एका तरुणाच्या इंग्रजी साहित्यातील संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. जर्मनीच्या एका प्रकाशनाने त्याचा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.
इंग्रजी साहित्य : पुस्तक रुपाने संशोधन प्रसिद्ध
यवतमाळ : प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेल्या एका तरुणाच्या इंग्रजी साहित्यातील संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. जर्मनीच्या एका प्रकाशनाने त्याचा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. चेहऱ्यावरील हावभावातून मनातील भावनांचे प्रगटीकरण शोधण्याचा प्रयत्न त्याने या संशोधनातून केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ब्रम्ही या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव आहे गणेश बळवंत मुंढे.
ग्रामीण भागात राहून इंग्रजी वाङ्मयात संशोधन करणारा गणेश हा शेतकरी कुटुंबातील आहे. घरी कोणतेही साहित्यिक वातावरण नाही, इंग्रजीचा दूरदूरचा संबंध नाही. मात्र आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर त्याने पुणे विद्यापीठातून इंग्रजी वाङ्मयात पदव्युत्तर पदवी घेतली. यावरच तो थांबला नाही तर त्याने इंग्रजी साहित्यात संशोधन सुरु केले. पुणे विद्यापीठातून एमफील करताना ‘अ स्टडी आॅफ कर्न्व्हसेशनल प्रिंसीपल अॅन्ड अॅब्सुलिटी इन सॅम्युअल बॅकेट एन्ड गेम’ या विषयावर संशोधन केले. माणसाच्या मनातील भावना सहसा कुणालाही कळत नाही. परंतु त्याचा चेहरा मात्र सारेच भाव सांगून जातो. मनात दडलेल्या या भावना नेमक्या कशा ओळखायच्या यावर त्याने संशोधन केले. आंधळा, मुका, बहिरा आणि अपंग अशा चार जणांची कहाणी त्याने डोळ्यासमोर ठेवली. ते आपल्या समस्यांचे निराकारण कसे करतात, त्यांचे भाव कसे प्रगट होतात यावर संशोधन केले. एमफीलच्या या प्रबंधाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. जर्मनीच्या लँबर्ड पब्लिकेशनने हा संशोधन ग्रंथ प्रकाशित केला आहे. जागतिक स्तरावर या पुस्तकाला मान्यता मिळाली असून त्याला आंतरराष्ट्रीय पुस्तक मानांकनाचा दर्जाही मिळाला आहे. तसेच या संशोधनाचे पेटंट करण्याचा प्रयत्न तो करीत आहे. गणेश हा सध्या पुणे येथील राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरींगमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून याच विषयावर त्याला पीएचडीसाठी संशोधन करावयाचे आहे. एका ग्रामीण भागातील तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संशोधन पोहोचविले. ग्रामीण भागातील तरुणही संशोधनाच्या क्षेत्रात मागे नाहीत, हे त्याने सिद्ध केले. (प्रतिनिधी)