अंधारलेल्या दृष्टीला हवी मदतीची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:52 AM2017-11-01T01:52:23+5:302017-11-01T01:52:35+5:30

तो नुसताच आवाजाच्या दिशेने पाहतो...हाताने चाचपडतो...त्या स्पर्शाने आई-बाबाला ओळखतो... दोन्ही डोळे सताड उघडे असलेतरी त्यात दृष्टी नाही..

The Blaze for the Help of the Dark Eye | अंधारलेल्या दृष्टीला हवी मदतीची ज्योत

अंधारलेल्या दृष्टीला हवी मदतीची ज्योत

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्या धनुषला डोळ्यांचा कर्करोग : डॉक्टरांनी सांगितला चार लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तो नुसताच आवाजाच्या दिशेने पाहतो...हाताने चाचपडतो...त्या स्पर्शाने आई-बाबाला ओळखतो... दोन्ही डोळे सताड उघडे असलेतरी त्यात दृष्टी नाही...ही भावना त्या आई-वडिलांना ग्रासते...डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेली दृष्टी मिळावी म्हणून त्या कुटुंबाने हैदराबाद गाठले. तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देत चार लाख रुपयांचा खर्च सांगितला. मात्र हा पैसा या गरीब कुटुंबाचा आड येत आहे. मुलाल जगवावे तरी कसे, या चिंतेने या कुटुंबाचे जगणे हराम झाले आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
एक वर्षीय धनुष घोडेले त्या चिमुकल्याचे नाव. डी. रुख्माबाई उपारकर प्लॉट नं.१५८ आराधना नगर खरबी चौक येथील रहिवासी प्रदीप घोडेले यांचा तो मुलगा. धनुषचे वडील पुजारी. लोकांच्या घरोघरी जाऊन पूजापाठ करून मिळालेल्या पाच-सहा हजारात कसेतरी घर चालवितात. आई शालू गृहिणी आहे. ‘लोकमत’शी बोलताना प्रदीप घोडेले म्हणाले, धनुष जन्मला तो दिवस १५ आॅगस्ट, स्वातंत्र्य दिन होता. त्याच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण होते. अंगाखाद्यावर खेळणारा धनुष कधी एक वर्षाचा झाला ते कळलेच नाही. एकदा त्याची आई दूध पाजत असताना धनुषच्या डोळ्यात काही फरक जाणवला.
तो आपल्याकडे नीट पहात नाही. केवळ स्पर्शाने ओळखतो या जाणिवेने कासावीस झाली. कारण, मोठी मुलगी जान्हवी हिच्याही दोन्ही डोळ्यात कर्करोग होता. मोठ्या आर्थिक संकटात सापडलो होतो. मात्र, समाजाच्या आर्थिक मदतीमुळे रुग्णालयाचा मोठा खर्च उचलल्या गेला. यामुळे तिचा एक डोळा वाचला. आता पुन्हा दुसरे मुल त्याच आजाराने पीडित तर नाही, ही कल्पनाही केली जात नव्हती. दुसºया दिवशी मेडिकलमध्ये धनुषची तपासणी केली, आणि डॉक्टरांनी दोन्ही डोळ्यात कर्करोगाच्या गाठी असल्याचे सांगताच पायाखालची जमीनच सरकली. उसने पैसे घेऊन हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर साईट’ रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी दोन्ही डोळ्यांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. याला चार लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचेही सांगितले. पुजारी म्हणून काम करताना एवढा मोठा पैसा उभा करणे कठीण असल्याचे सांगत घोडेले यांनी हात जोडून मदतीची याचना केली. घोडेले या कुटुंबाला समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास चिमुकल्या धनुषचे डोळे वाचतील, या गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळेल ही एकमेव आशा या कुटुंबाला आहे. एकवर्षीय धनुष या चिमुकल्याला समाजाच्या मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. धनुष प्रदीप घोेडेले यांना मदत करू इच्छिणाºयांनी ‘भारतीय स्टेट बँक’, शाखा खरबी चौक येथील खाते क्रमांक ३७२०२७९०९८२ व ‘सीआयएफ नंबर’ ८९९८६२९३८५५ यावर धनादेश किंवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. प्रदीप घोडेले यांना ७४१४९६७५६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

समाजमनामुळे जान्हवीला मिळाली दृष्टी
प्रदीप घोडेले यांची पहिली मुलगी जान्हवी पाच महिन्याची असताना दोन्ही डोळ्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते. आर्थिक परिस्थती बेताची असल्याने वडिलांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले, त्याला शेकडो मदतीचे हात या चिमुकलीसाठी सरसावले आणि समाजाच्या या उदारतेमुळे जान्हवीचा एक डोळा वाचू शकला. आता पुन्हा एक वर्षीय धनुषसाठी याच उदारतेचे दर्शन घडण्याची आशा प्रदीप घोडेले बाळगून आहेत.
‘लोकमत’ने ८ जुलै २०१५ रोजी ‘दुडूदुडू धावण्यासाठी चिमुकलीला हवीय दृष्टी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने अवघे समाजमन गहिवरले. घोडेले कुटुंबीय सोसत असलेली वेदनेने समाजमन हादरवून गेले. बेरार फायनान्स लि.चे. चेअरमन मारुती जंवजार देवदूतासारखे धावून आले. चिमुकल्या जान्हवीच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखविली. त्यांचा मुलगा संदीप यांनी स्वत: हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर साईट’ या रुग्णालयाशी संपर्क साधून तेथील उपचार आणि शस्त्रक्रियेच्या खर्चाची तरतूद केली. तर आ. सुधाकर कोहळे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्री निधीतून ३० हजारांची मदत झाल्याने रुग्णालयाचा मोठा खर्चाचा भार उचलला गेला. या सर्वांच्या मदतीमुळेच जान्हवीचा एक डोळा वाचला. आज जान्हवी अडीच वर्षाची आहे. तिची दृष्टी परत मिळाली आहे. हीच अपेक्षा एकवर्षीय धनुषसाठीही त्याचे वडील प्रदीप घोडेले यांनी केली आहे.

Web Title: The Blaze for the Help of the Dark Eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.