दृष्टिहीनाची सातासमुद्रापार भरारी

By admin | Published: March 6, 2017 02:08 AM2017-03-06T02:08:32+5:302017-03-06T02:08:32+5:30

दृष्टी असणे आणि नसणे हा केवळ दृष्टिकोनाचा फरक आहे. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, हाच खरा प्रश्न आहे ...

Bleary | दृष्टिहीनाची सातासमुद्रापार भरारी

दृष्टिहीनाची सातासमुद्रापार भरारी

Next

अमेरिकेच्या विद्यापीठाकडून डी.लिट. : सामाजिक, साहित्य क्षेत्रातही कामगिरी
निशांत वानखेडे नागपूर
दृष्टी असणे आणि नसणे हा केवळ दृष्टिकोनाचा फरक आहे. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, हाच खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न डोळसांनाही असतोच. मात्र प्रत्येकाला आपले कर्तृत्व आणि अस्तित्व सिद्ध करावे लागतेच. डॉ. विनोद आसुदानी यांनी ते कर्तृत्व सिद्ध केले आहे. जन्मापासूनच अंध असलेल्या नागपूरच्या या सुपुत्राने उच्च शिक्षणाच्या भरवशावर साता समुद्रापार अमेरिकेच्या धुरिजनांना स्वत:च्या कर्तृत्वाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ अमेरिकातर्फे त्यांना डी.लिट. या मानद उपाधीने सन्मानित केले आहे.
त्यांच्या घरी पाच भाऊ-बहिणी आहेत आणि हे सर्वच्यासर्व दृष्टिहीन आहेत, ही बाब अधिक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी आहे. मात्र यात सुखद आणि आनंददायी बाब म्हणजे हे सर्व भावंड मोठ्या पदावर नोकरीला आहेत. मोठे डॉ. घनश्याम आसुदानी हे वरोरा येथे कृषी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लहान राजेश आसुदानी हे रिझर्व्ह बँकेत एजीएम पदावर कार्यरत आहेत. त्यातलेच एक डॉ. विनोद आसुदानी हे सध्या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एचओडी म्हणून कार्यरत आहेत.
आसुदानी यांच्यासाठी काहीच अनुकूल नव्हते. जन्मापासून मिळालेला अंधत्वाचा शाप आणि त्याहून घरची हलाखीची परिस्थिती हे वेगळे संकट. वडील फिरते रिटेल शॉप चालवायचे. मात्र अशाही परिस्थितीत विनोद व त्यांचे भाऊ हे प्रज्ञाचक्षू ठरले. त्यांनी घरच्या परिस्थितीवर आणि स्वत:च्या दृष्टिहीनतेवर मात करीत उच्च शिक्षण मिळविले. प्रसंगी मिळेल ते काम करून शिक्षणासाठी कष्ट उपसले. कारण शिक्षण हाच त्यांच्या प्रगतीचे द्वार उघडेल, हा त्यांचा मोठा विश्वास. हा विश्वास त्यांनी सार्थ ठरविला.
डॉ. विनोद आसुदानी हे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यासोबत त्यांनी स्वत:च्या १० पुस्तकांचे लेखन केले असून, १० इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. साहित्यासह गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. दृष्टिहीनांसाठी आॅडिओ कॅसेट लायब्ररीची स्थापना त्यांनी केली व दिव्यांगांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. दिव्यांगांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे जीवनाचे ध्येय त्यांनी निर्धारित केले आहे. डॉ. विनोद हे देशातील पहिले मानसोपचार सल्लागार आहेत. एवढेच नाही तर केंद्रीय साहित्य अकादमी, न्यू दिल्लीच्या सल्लागार मंडळावर देशातील एकमेव पाच वर्षांसाठी मनोनित सदस्य आहेत.

विनोद आसुदानी यांचा आज सत्कार
शिक्षण संस्कृती उत्थान न्यास तसेच ब्लार्इंड रिलीफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विनोद आसुदानी यांच्या सत्काराचा अलंकरण-सन्मान समारोह सोमवारी सायंकाळी ५ वाजता अंध विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉ. आसुदानी यांच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वामी विवेकानंद ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे उद््घाटन होणार आहे. यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Bleary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.