नाना पटोलेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याचा ठपका : राजकीय वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 08:28 PM2019-04-16T20:28:50+5:302019-04-16T20:30:35+5:30
न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सदर पोलीस ठाण्यात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती कळताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सदर पोलीस ठाण्यात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती कळताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
सरपंच भवनातील ईव्हीएम मशिनची एफएलसी तपासणी सुरू असल्यामुळे २५ ते २८ मार्च दरम्यान स्ट्राँग रूम मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नव्हते. त्यामुळे पटोलेंनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचिका दाखल केली होती. या संबंधाने न्यायालयाने ६ एप्रिलला दिलेल्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता पटोलेंनी त्यांच्या व्टिटर अकाउंटवर ७ एप्रिलला ‘ ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमचे फुटेज पटोलेंना द्या, कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश, आम्ही नागपूरकरांसाठी लढा लढल्याशिवाय राहणार नाही. हे दाखवून दिले. निवडणूक खुली व निष्पक्ष झालीच पाहिजे, असे संदेश प्रसारित केले होते’. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. या संबंधाने एमसीएमसी कमिटीत चर्चा झाली आणि पटोलेंना खुलासाही मागण्यात आला होता. त्यांच्याकडून आलेला खुलासा लक्षात घेता त्यांनी निवडणूकीवर गैरवाजवी प्रभुत्व पाडल्याचे अर्थात आचार संहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षात नोडल अधिका-यांनी पटोलेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सोमवारी सदर पोलीस ठाण्यात या संबंधाने तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार स्विकारून कलम १७१ सी/ १७१, एफ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.