फोनवर नेत्यांना अपशब्द बोलणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:53 AM2019-06-06T00:53:58+5:302019-06-06T00:56:27+5:30
शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
जयहरी सिंह हे संजय गांधी निराधार योजनेचे (पश्चिम नागपूर) अध्यक्ष आहेत. तर तिडके हे नामनिर्देशित सदस्य आहेत. दोघांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेचा ‘ऑडिओ’ खूप ‘व्हायरल’ झाला आहे. या ‘ऑडिओ’त दोघेही पक्षाच्या मंडळ अध्यक्षांपासून आमदार तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्दांचा वापर करत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. हा ‘ऑडिओ’ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी दोघांकडूनही स्पष्टीकरण मागितले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे कोहळे यांनी दोघांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. या दोघांनाही संजय गांधी निराधार योजनेतूनदेखील बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
बळीचा बकरा बनविले
जयहरी सिंह यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध केला आहे. मला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. मी भाजप किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याबद्दल एकही शब्द बोललेलो नाही, असे त्यांनी सांगितले. तिडके यांनी पटोलेंना मतदान करण्याचा ‘एसएमएस’ पाठविला होता. त्यांनी त्याला नकार दिला. केवळ पिच्छा सुटावा म्हणून ‘ठीक आहे’ असे उत्तर दिले होते. माझ्याकडे सर्व ‘फुटेज’ उपलब्ध आहे. मी भाजपाचा सच्चा कार्यकर्ता आहे व भविष्यातदेखील राहील, असे त्यांनी सांगितले.