अंध चेतन गाणार ‘प्रश्नचिन्ह’च्या मदतीसाठी

By admin | Published: August 13, 2015 03:37 AM2015-08-13T03:37:43+5:302015-08-13T03:37:43+5:30

चेतन काही थोर नाही, ज्येष्ठही नाही, ११ वर्षांचा चिमुकला तो, त्यातही जन्मांध. वडिलांचे संस्कार आणि परिस्थितीची जाणीव असल्याने,

Blind Chetan to sing 'question mark' to help | अंध चेतन गाणार ‘प्रश्नचिन्ह’च्या मदतीसाठी

अंध चेतन गाणार ‘प्रश्नचिन्ह’च्या मदतीसाठी

Next

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘एक शाम देश के नाम’ : हरहुन्नरी कलावंत हरफनमौला व्यक्तिमत्त्व
नागपूर : चेतन काही थोर नाही, ज्येष्ठही नाही, ११ वर्षांचा चिमुकला तो, त्यातही जन्मांध. वडिलांचे संस्कार आणि परिस्थितीची जाणीव असल्याने, बालवयातच तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत आणि मदतगार ठरला आहे. आणखी एक वैशिष्ट्य, तो अतिशय उत्तम गायक आहे. आपल्या गायकीच्या माध्यमातून तो ‘प्रश्नचिन्ह’ या शाळेसाठी मदतीचा हात देतो आहे. नागपुरातील काचोरे लॉन पुढील गीतांजली सोसायटीच्या प्रांगणात १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा कार्यक्रम होणार आहे. लाखो रुपयांचे पॅकेज मिळवूनही वंचितांच्या मदतीसाठी हात आखडते घेणारे समाजातील बहुसंख्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला लावणारे कार्य तो करतो आहे.
चेतनचा स्वत:चा आॅर्केस्ट्रा आहे. तो कन्या भ्रूणहत्या, स्वच्छता अभियान, शेतकरी आत्महत्या यावरही कथाकथन करतो. हार्मोनियमवर शास्त्रीय संगीताचे ३६ राग वाजवितो आणि गातो. २५०० गाणी त्याला पाठ आहेत. त्याचे महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातही बरेच कार्यक्रम झाले आहे. त्याने या कार्यक्रमातून मिळविलेल्या पैशातून पाच अंध अनाथ बालकांना दत्तक घेतले आहे. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना पाच हजार सौरकंदिल दिले आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप, अंधांना काठीचे वाटप त्याने केले आहे. बरं तो श्रीमंत आहे, असेही नाही, त्याच्या वडिलांकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. वडिलांकडून मिळालेल्या संस्कारातून तो हे करू शकला आहे.
‘प्रश्नचिन्ह’ सुद्धा अशीच एक संस्था, वंचितांचे जिणे नशिबी आलेल्या फासेपारध्यांच्या मुलांसाठी अमरावती जिल्ह्यात ‘प्रश्न’ नावाची शाळा मतीन भोसले चालवतात. तब्बल ४४५ विद्यार्थी या शाळेत शिकतात. यातील कुणाला वडील नाहीत, कुणाची वडील तुरुंगात आहेत तर कुणी रस्त्यावर भीक मागतात. मतीन भोसले त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडत आहेत. ‘पश्नचिन्ह’ला काही मदत करता यावी या उद्देशाने मनीष नगरातील गीतांजली सोसायटीमधील हरीश खेडकर आणि त्याच्या मित्रांच्या झिरो माईल सामाजिक संस्थेने ‘एक शाम देश के नाम’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात चेतन उचितकर गायन करणार आहे. (प्रतिनिधी)
कार्यक्रम नि:शुल्क आहे, मात्र एक अट आहे
कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांनी त्यांच्याकडे जुने पण सुस्थितीतील कपडे, जुन्या वह्या-पुस्तके, पेन, खेळणी, भांडी, धान्य असे साहित्य आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोळा झालेले हे साहित्य प्रश्नचिन्ह मधील विद्यार्थी आणि पारधी बांधवांसाठी पाठविण्यात येणार आहे. १४ आॅगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी सकाळी ९ पासून हे साहित्य स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Blind Chetan to sing 'question mark' to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.