अंध, अपंगांचे साहित्य व कला संमेलन १७ व १८ नोव्हेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:08 AM2018-10-30T01:08:32+5:302018-10-30T01:10:48+5:30
अंध व अपंगांचे तिसरे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन येत्या १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आमदार निवास येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक अनंत ढोले यांची निवड झाली असून, उदघाट्नप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश गजभिये यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
नागपूर : अंध व अपंगांचे तिसरे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन येत्या १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आमदार निवास येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक अनंत ढोले यांची निवड झाली असून, उदघाट्नप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश गजभिये यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
समाजोत्थान अंध व अपंग सामाजिक कल्याणकारी संस्था आणि राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अंध व अपंगांच्या साहित्यकृती, कलाविष्कार व अभिव्यक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाजोत्थान संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षापासून हे संमेलन होत आहे. दोन दिवसीय संमेलनामध्ये परिसंवाद, प्रकट मुलाखत, विविध कलादर्शन, कवी संमेलन, कथाकथन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. संमेलनाला राज्यभरातून ५०० च्यावर अंध व अपंग मान्यवर कवी, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व सहयोगी संस्था सहभागी होणार असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले. कवी त्र्यंबक मोकासरे यांच्या अध्यक्षतेत चंद्रपूरला पहिले तर कवी काशीनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेत जळगाव येथे दुसरे संमेलन घेण्यात आले होते. संमेलनासाठी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संस्थेचे संस्थापक सचिव रेवानंद मेश्राम, रणजित जोशी, डॉ. बळवंत भोयर आदी उपस्थित होते.