आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे .....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:41 AM2018-11-18T00:41:40+5:302018-11-18T00:42:38+5:30
शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.
कवयित्री राधा बोर्डे स्मृती कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून काशिनाथ महाजन व प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत उपस्थित होते. कवी संमेलनाची सुरुवात कवयित्री मीनल येवले यांनी ‘वाट माझी साधी सरळ, कधीच सरत नाही...’ या कवितेने केली. भारती दवणे यांनी ‘अनेक काटे मार्गात असले तरी, मी जगणार आहे...’ अशी प्रेरणादायी कविता सादर केली. सोनम चौधरी यांनी आई-वडिलांची थोरवी गाणारी कविता सादर केली. गणेश पांडे यांनी ‘फुल जरी होऊ शकला नाही, काटा होऊ नकोस’ या आशयाची ‘मानसा’ ही कविता सादर केली. राजेश मारोतकर यांनी ‘चेहरे आरशांचे धुवायचे राहिले...’ या आशयाची कविता सादर करून सामाजिक वेदनेची जाणीव करून दिली. गजानन मानकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, भूपेश नितनवरे यांनी ‘हाय यावी नेमकी का याद आता...’ ही कविता सादर केली. अंध कवी रामराव जंजाळ यांनी ‘निसर्गाच्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा’ या कवितेतून निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य प्रकट केले. राकेश पावरा यांनी ‘थोडे समजून घे रे...’ रमेश बगे यांनी ‘आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे...’ या कविता सादर केल्या. सुरेखा रडके यांनी ‘आई मला जन्म नवा घेऊ दे...’, विद्याधर बन्सोड यांनी ‘दिवा माझा असेलच, फक्त तुझी वात दे...’ अशा वेगवेगळ्या आशयाच्या कविता, नज्म, शायरी यावेळी राजेश आसुदानी, शेषराव धांडे, रुपकिशोर कनोजिया, बाळकृष्ण राऊत, प्रशांत ढोले, प्रदीप देशमुख यांच्यासह अनेकांनी सादर केल्या. कविसंमेलनाचे संचालन डॉ. बळवंत भोयर यांनी केले. सर्व कवींना आमदार प्रकाश गजभिये यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
ये बिल बहुमतो से हो जाये सँगशन
सरकार लागू करते अमिरो को पेंशन, और दे दे जहर गरीबो को, की मिट जाये टेंशन, भारत के लिडरो है अर्ज की, ये बिल बहुमतो से हो जाये सँगशन... गरीबांची वेदना सरकार दरबारी अतिशय मार्मिक शब्दात या कविसंमेलनात जमिल अन्सारी यांनी पोहचविली.