अंध रमेश बासरीतून पेरतात जीवनाचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 09:53 PM2018-03-28T21:53:35+5:302018-03-28T21:53:46+5:30
आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत:ला संगीत साधनेतून स्वत:चे आयुष्य तर फुलवलेच, सोबतच हा ठेवा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत:ला संगीत साधनेतून स्वत:चे आयुष्य तर फुलवलेच, सोबतच हा ठेवा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
रमेश गुलानी हे मूळचे मूल जि. चंद्रपूर येथील रहिवासी. ते जन्मत:च दृष्टिहीन आहेत. परंतु आपल्याला काहीच दिसत नाही, या विचाराने ते कधीच खचून गेले नाहीत. वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी नागपुरातील श्रद्धानंद अंध विद्यालयात शिक्षण घेतले. येथेच बासरी वाजविण्याच्या कलेत ते निपुण झाले. पुढे वणीत बीएपर्यंत शिक्षण पूर्ण करून १९७४ ला ते आकाशवाणी पुणे केंद्रात बासरीवादक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी नरेंद्र भिवापूरकर अंध शाळा, अमरावतीचे संस्थापक सदस्य, आनंदवन वरोऱ्यात मुख्याध्यापक, पुण्याजवळ आळंदी येथील जागृती अंध कन्या विद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. १९९९ ला त्यांनी स्वरांगण दृष्टिहीन संस्था स्थापन केली. २००७ मध्ये ते आकाशवाणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते घरी बसले नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांना बासरी शिकविणे सुरू केले. विविध ठिकाणी बासरीवादनाचे कार्यक्रम ते घेतात. कोणत्याही शहरात गेले तरी त्या शहरातील एखाद्या शाळेत जाऊन ते विद्यार्थ्यांपुढे बासरी वाजवितात. विद्यार्थ्यांना बे्रल लिपीबद्दल माहिती देतात. अंध व्यक्तींना मदत कशी करावी, याच्या टीप्स देतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. एखादा अवयव निकामी झाला आणि कठीण प्रसंग आला की जगण्याची उमेद सोडून देणाऱ्या व्यक्तींनी प्रेरणा घ्यावी, असेच रमेश गुलानींचे व्यक्तिमत्त्व आहे.