नेत्रबाधितांनी घेतले वैदर्भीय किल्ल्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:53 PM2020-02-29T22:53:34+5:302020-02-29T22:54:33+5:30
डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. किल्ले दर्शनाचा हा अनुभव आता हे नेत्रबाधित विद्यार्थी आपल्या वहीत उतरवणार आहेत, हे विशेष.
किल्लेप्रेमी व संशोधक शिरीष दारव्हेकर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम प्रथमच आरंभिल्या गेला आणि ९ ते १९ फेब्रुवारी रोजी माधव नेत्रपेढीअंतर्गत नेत्रबाधितांसाठी कार्य करणाऱ्या सक्षमने किल्ले दर्शनाचे अभियान राबविले. या अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन या आंतरराष्ट्रीय संस्थेने केली. व्यंग असला की रडत बसू नये, ही नवी पिढी सांगते. उलट एक अंग नसला की त्या व्यंगावर मात करण्यासाठी व्यक्ती आसुसलेला असतो आणि हीच ओढ त्याला नवा आविष्कार घडविण्यास मदत करीत असते. हीच वृत्ती नेत्रबाधितांमध्ये प्रबळ करण्याचे कार्य सक्षम ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. त्याअनुषंगाने पदवी घेतलेल्या आणि इतिहासात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या १० मुलांची व १० मुलींची निवड या अभियानासाठी करण्यात आली. किल्ले कसे बघावे, प्रश्न कसे काढावे, त्याचे अवलोकन कसे करावे, कुठल्या नोंदी ठेवाव्यात, हा प्रश्न नेत्रबाधितांपुढे होताच. स्पर्श हेच सगळ्यात मोठे अस्त्र असलेल्या नेत्रबाधितांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे म्हणजेच किल्ले दर्शनाचे हे अभियान होते. किल्ले दर्शनाची तारीख ठरली, किल्लेही ठरले. तत्पूर्वी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. प्रसिद्ध किल्लेतज्ज्ञ व प्रतिकृती साकारणारे अतुल गुरू यांनी १५ दिवस या सगळ्यांचे प्रशिक्षण दिले आणि ९ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विदर्भात १३ किल्ल्यांचे दर्शन घेण्याचा काळ ठरला. शिरीष दारव्हेकर, अतुल गुरू आणि प्रबंधक सुजाता सरागे यांच्या नेतृत्वात माहूरगड येथून या अभियानास सुरुवात झाली.
किल्ले दर्शन घेण्यापूर्वी शिवस्तुती प्रार्थना केली की स्फुरण चढणे आलेच. त्याअनुषंगाने आधी किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगणे व पाहून झाल्यावर उजळणी करणे, असा दिनक्रम संपूर्ण अभियानादरम्यान राहिला. माहूरगडानंतर सिंदखेडराजा येथील जिजाऊंचे जन्मस्थळ, अकोला येथील बाळापूरचा किल्ला, मेळघाटातील नरनाळा किल्ला, चिखलदऱ्यातील गाविलगड, अचलपूरचा किल्ला व हौज कटोरा, जलालखेडा येथील आमनेर किल्ला, भंडारा येथील अंबागड किल्ला, पवनीचा किल्ला, चंद्रपूरचा माणिकगड किल्ला, नागपूरचा सीताबर्डी किल्ला याचे दर्शन करण्यात आले. या संपूर्ण अभियानात रोटरीचे २० स्वयंसेवक प्रत्येक नेत्रबाधितांच्या मदतीला होते. तसेच सक्षमचे संध्या दारव्हेकर, अरविंद सहस्रबुद्धे, रश्मी उराडे, रोटरीचे विश्वास शेंडे, विवेक शहारे, विवेक बोरकर, कौस्तुभ डांगरे हे मदतीला होते.
शेतीसाठी पूरक कोळी सापडल्या
या अभियानादरम्यान बाळापूर किल्ल्यात कोळ्यांच्या २४ प्रजाती सापडल्याची माहिती या विद्यार्थ्यांना संबंधित तज्ज्ञांनी दिली. या कोळ्या रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय असून, शेतीमध्ये किडीपासून पिकांना वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधन सुरू झाले आहे.
पंतप्रधानांनी केली ‘मन की बात’
२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या रेडिओ संवादात या उपक्रमाचा उल्लेख याच महिन्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केला. या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले.
किल्ले संशोधक श्रीपाद चितळे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आकाराला आला. क्षमता सिद्ध करण्यास डोळे आवश्यक असतेच असे नाही. उर्वरित संवेदनांनीदेखील उद्दिष्ट साध्य करता येते, हे या अभियानातून सिद्ध झाले आहे.
शिरीष दारव्हेकर, अभियान प्रमुख
विदर्भातील भोसले व गोंड राजांचे किल्ले लोकांना माहीतच नाहीत. या किल्ल्यांना महत्त्व मिळावे व त्यांचा विकास व्हावा, सरकारने लक्ष पुरवावे याच हेतूने हे अभियान राबविण्यात आले. नेत्रबाधितांना गडकोटाची जाणीव म्हणून ही मोहीत राबविण्यात आली.
सुजाता सरागे, प्रबंधक