अंध फेरीवाल्यांनी मोर्चा काढून केला आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:11 PM2017-12-18T20:11:58+5:302017-12-18T20:13:46+5:30
अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. रेवाराम टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात विदर्भातील अंध बांधव सहभागी झाले होते. टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, मुंबईतील एल्फिस्टन दुर्घटनेस फेरीवाल्यांना जबाबदार धरले जात असून अजूनही कारवाई सुरू आहे. अंध फेरीवाले हे अल्पशिक्षित तर काही अशिक्षित आहेत. यामुळे त्यांना अन्य रोजगाराच्या संधी मिळणे कठीण आहे. यामुळे त्यांना रेल्वे परिसरात व रेल्वे गाड्यांमध्ये व्यवसाय करू देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या मोर्चाचे नेतृत्व रेवाराम टेंभुर्णीकर, डॉ. मनीष थूल, देवराव मेश्राम, गजानन पोपळघाट यांनी केले. अंध फेरीवाल्यांना रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये वस्तू विक्रीचा परवाना द्यावा, १२ वीपेक्षा कमी शिक्षित अंध व्यक्तीना शासकीय नोकरीत समावून घ्यावे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालय, मॉल व बाजारपेठेत अशिक्षित व अल्पशिक्षित अंध व्यक्तीला किमान एका स्टॉलची जागा द्यावी, फेरीवाल्यांच्या संख्येत चार टक्के आरक्षित जागा द्याव्यात आदी मागण्या या मर्चाच्या वतीने करण्यात आल्या.