दु:खी चेहऱ्यावर फुलविले हास्य

By admin | Published: February 20, 2017 02:04 AM2017-02-20T02:04:47+5:302017-02-20T02:04:47+5:30

एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. ...

Bloated laughter on the sad face | दु:खी चेहऱ्यावर फुलविले हास्य

दु:खी चेहऱ्यावर फुलविले हास्य

Next

‘जीएमसी आरोग्यम’ने दिला ९१८ रुग्णांना आधार : मेडिकल ते मेळघाट ठरला संवेदनेचा सेतू
नागपूर : एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. असेच समाधान दुर्गम भाग असलेल्या मेळघाट (चिलाठी) येथील ‘हतरु’ या गावात आयोजित केलेल्या ‘जीएमसी आरोग्यम’ या अभियानात परिश्रम घेतलेल्या डॉक्टरांपासून ते वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. तब्बल दोन महिन्यांचे नियोजन, दुर्गमभागातील १९ गावांशी संपर्क व ९१८ रुग्णांवर उपचार करून हे अभियान येथेच थांबले नाही तर गंभीर आजाराच्या ७२ रुग्णांना नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली. या अभियानातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाने समाजापुढे रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे.
जिथे रस्ते नाही, वीजही नीट पोहचलेली नाही, पाण्याची भीषण समस्या आहे त्या भागात रुग्णसेवा देण्याचा विचार मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना बोलून दाखविला, तेव्हा त्यांनी त्यांची पाठ थोपटली. सहकार्याचे भक्कम पाठबळच उभे केले. त्यांच्या ध्यासाला कृतीची नवी ऊर्जा दिली. यामुळेच मेळघाटच्या हतरु गावात हे आरोग्यम शिबिर होऊ शकले. ९ आणि १० फेब्रुवारीला आयोजित या शिबिरात ९१८ लोकांची नागपुरातून आलेल्या विशेषज्ञांनी तपासणी केली. नि:शुल्क औषधे दिली. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना नागपुरात आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य हाती घेतले. शिबिरापूर्वी विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन पथनाट्य सादर केले. यातून विविध आजारांची, स्वच्छतेची माहिती लोकांपर्यंत पोहचवली.
या शिबिरात डॉ. श्रीगिरीवार, डॉ. शैलेश गहूकर, डॉ. शेलगावकर, डॉ. मानसी श्रीगिरीवार, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. आशिष बदखल, डॉ. अमोल समर्थ, डॉ. ललित महाजन, डॉ. पराग मून, डॉ. महेश कुमार, डॉ. मिलिंद उल्लेवार, डॉ. परिमल तायडे, डॉ. भावेश पटेल, डॉ. अश्लेष तिवारी, डॉ. गीतेश सावरकर, डॉ. निखिल कांबळे, डॉ. प्राची थुल. डॉ. सुशील मानवटकर, डॉ. गोपाल सोळंके, डॉ. रवी यादव, डॉ. रमिज पंजवानी डॉ. मनोज गेडाम, डॉ. खत्री यांच्यासह ६० विद्यार्थ्यांनी सेवा दिली. माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी आणि मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अकोला विभागाचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी दिलेल्या देणगीतून हे शक्य झाल्याचे डॉ. श्रीगिरीवार म्हणाले.(प्रतिनिधी)

‘जीएमसी आरोग्यम’ आता थांबणार नाही
मेळघाटच्या हतरु गावापासून सुरू झालेले ‘जीएमसी आरोग्यम’ हे आता थांबणारे नाही. या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे कार्य निरंतर सुरू राहील. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ‘जीएमसी आरोग्यम’चा ग्रुप तयार करण्याचाही प्रयत्न असणार आहे.
-डॉ. मनीष श्रीगिरीवार
विशेष कार्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय

Web Title: Bloated laughter on the sad face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.