थर्टी फर्स्टपूर्वी तस्करांची नाकाबंदी
By admin | Published: December 31, 2016 02:54 AM2016-12-31T02:54:24+5:302016-12-31T02:54:24+5:30
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील सर्व अतिसंवेदनशील स्थळांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागपूर : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील सर्व अतिसंवेदनशील स्थळांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शुक्रवारी रात्री अंदाजे दोन कोटी रुपयांची महागड्या विदेशी दारूची तस्करी पकडली. रेल्वेस्थानकावर सकाळी ७१ किलोच्या गांजाची तस्करीही उजेडात आली तर चंद्रपूरकडे जाणाऱ्या ३१२ दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरपीएफच्या या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.
७ लाखांचा गांजा पकडला तीन महिलांना अटक
दक्षिण एक्स्प्रेसने दिल्लीला ७ लाख ६९ हजार रुपये किमतीच्या ७३ किलो ५०० ग्रॅम गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जनरल वेटिंग हॉलमध्ये घडली.
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान रजनलाल गुजर, विकास शर्मा यांना रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसने दिल्लीला गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक होती लाल मिना, कृष्णा नंद राय, विकास शर्मा, आरपीएफ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अरुण ठवरे, दीपक वानखेडे, विजय पाटील, किशोर चौधरी यांची चमू गठित करण्यात आली. या चमूने लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर आणि त्यांच्या चमूसोबत दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी तीन महिला जनरल वेटिंग हॉलमध्ये बॅग घेऊन संशयास्पद अवस्थेत आढळल्या. आरपीएफचा श्वान रेक्सच्या साहाय्याने त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. कुसुम शेख (५०) रा. तिलडंगा प. बंगाल, सीमा आबु कलाम (५०) मद्रासी कॉलनी दिल्ली आणि चंद्रिका वेलु स्वामी (४३) मद्रासी कॉलनी दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. गांजा आणि अटक केलेल्या महिलांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर वाडेकर, खुशाल शेंडगे, किशोर चांभारे, योगेश धुरडे, प्रवीण भिमटे, प्रशांत शिंदे करीत आहेत.
बॅगमधील तस्करी उजेडात
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दारूच्या १४ हजार ४५० रुपये किमतीच्या ३१२ पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
३१ डिसेंबरनिमित्त दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना मिळाली. त्यांनी याबाबतची सूचना वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, हेमराज वासनिक, राजू खोब्रागडे, प्रवीण चव्हाण, नीलकांत गोरे, दीपक वानखेडे यांची चमू गठित केली. चमूला प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या १२२ बाटल्या आणि आॅफिसर चॉईस कंपनीच्या १९० बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १४ हजार ४५० रुपये आहे. कागदोपत्री कारवाईनंतर ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.(प्रतिनिधी)
थर्टी फर्स्टसाठी रेल्वेमार्गाने दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, उपनिरीक्षक अरुण ठवरे यांना मिळाली. त्यांनी लगेच आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांना ही माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होती लाल मिना, आरपीएफ जवान विकास शर्मा, विनोद राठोड आणि जवळपास २५ जवानांची चमू गठित करण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस रात्री ८.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आल्यानंतर आरपीएफच्या चमूने या गाडीच्या पार्सल बोगीची झडती घेणे सुरू केले. या बोगीतून दारूच्या पेट्या उतरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. त्यानंतर रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आली. या गाडीच्या पार्सल बोगीतूनही जवळपास दारूच्या ७५ पेट्या उतरविण्यात आल्या. या पेट्यातील दारू अतिशय महागडी असल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रेल्वे सुरक्षा दलाने या पेट्या फोडून त्यातील दारूच्या बाटल्याची संख्या आणि किंमत काढण्याचे काम सुरू केले होते.