ब्लॉकबस्टर, सुपरहिट गीतांच्या नागपूरकर जनकाचा ‘सांगीतिक’ गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:34 PM2018-09-28T23:34:01+5:302018-09-28T23:43:13+5:30

नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याचा सार्थ अभिमान नागपूरकरांना आहे.

Blockbuster, Superhit Geeta's of Nagpurian founder 'Sangitik' honored | ब्लॉकबस्टर, सुपरहिट गीतांच्या नागपूरकर जनकाचा ‘सांगीतिक’ गौरव

ब्लॉकबस्टर, सुपरहिट गीतांच्या नागपूरकर जनकाचा ‘सांगीतिक’ गौरव

Next
ठळक मुद्देविजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर‘हम से बढकर कौन’ ते ‘हम आपके है कौन’पर्यंतची ऐतिहासिक कारकीर्द

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना जाहीर झाला. विजय पाटील हे मूळचे नागपूरचे. याचा सार्थ अभिमान नागपूरकरांना आहे.
विजय काशीनाथ पाटील त्यांचे पूर्ण नाव. नागपुरातील उंटखाना वसाहतीत १६ सप्टेंबर १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील काशीनाथ आणि काका प्रल्हाद पाटील यांच्या संगीताचा वारसा त्यांना मिळाला. लहानपणापासून हार्मोनियम वाजविण्याची त्यांना आवड होती. उंटखाना येथील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण जी.एस. वाणिज्य महाविद्यालयातून घेतले. त्यांची संगीताबद्दलची आवड पाहत काकांनी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी धंतोली येथील भातखंडे संगीत संस्थेत टाकले. त्यांना ‘अकॉर्डियन’ वाजविण्याची मोठी आवड होती. याच ‘अकॉर्डियन’वर त्यांनी आयुष्याचे पहिले गाणे संगीतबद्ध केले. यातूनच त्यांना ‘आॅर्केस्ट्रा’ची कल्पना सुचली. नागपुरातीलच नव्हे तर मध्यभारतातील पहिला ‘कलाकरन’ नावाचा आॅर्केस्ट्रा तयार केला. संगीत क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी त्यांना मुंबई खुणावत होती. स्वत:च्या हिमतीवर मुंबई गाठली. सुरुवातीचा प्रवास खडतर राहिला. त्या स्थितीतही मुंबईत ‘अमर विजय’ या नावाने आॅर्केस्ट्राची सुरुवात केली. एकदा दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि त्यांनी १९७४ साली ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून निवड केली. येथूनच त्यांच्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात झाली. राम कदम यांच्यासोबत जोडी जमवून त्यांनी दादा कोंडके यांच्या अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांना संगीत दिले. दादांकडून त्यांना संगीतातील अनेक बारकावे शिकायला मिळाले. १९७६ पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' या नावाने संगीत द्यायचे. १९७७ मध्ये राम कदम यांचे निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी 'राम-लक्ष्मण' या नावानेच संगीत देणे सुरू ठेवलं. 'हम से बढकर कौन' चित्रपटातले 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. परंतु प्रचंड लोकप्रियता मिळाली ती १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून. या चित्रपटाचे सुपरहिट संगीत जनमानसाच्या मनामनात बसले. त्यानंतर आलेल्या ‘हम आपके है कौन’या चित्रपटाच्या यशामुळे राम लक्ष्मण यांचे नाव इतिहासात कायमचे नोंदल्या गेले.
त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी अशा १५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. 'अंजनीच्या सुता तुला', 'खेळ कुणाला दैवाचा कळला', 'जीवन गाणे गातच रहावे', 'झाल्या तिन्ही सांजा करून', 'पिकलं जाभूळ तोडू नका' या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलेलं आहे.
राम लक्ष्मण यांची कारकीर्द घडण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे. मराठी माणूस म्हणून त्यांच्याबदल आपुलकी वाटत असावी. लता मंगेशकर यांनी चित्रपटातील गाणी कमी केल्यानंतरही राम लक्ष्मण यांच्यासाठी गाण्यास कधीही नकार दिला नाही. आज त्यांच्याच नावाचा सर्वश्रेष्ठ संगीताचा पुरस्कार जाहीर झाला. यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

-पुरस्कारने स्मृतीचे पुनरुज्जीवन झाले
ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण म्हणाले, संगीत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शासनाचे मनपासून आभार. आजही माझ्या गाण्याचे अधिराज्य आहे, हे यातून सिद्ध होतेय. लोकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आणि हे प्रेम कायम ठेवावं, ही इच्छा आहे. या पुरस्काराने स्मृतीचे पुनरुज्जीवन झाले. पुरस्काराच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते दादा कोंडके यांची आठवण येत असल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title: Blockbuster, Superhit Geeta's of Nagpurian founder 'Sangitik' honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.