दीड महिन्यापासून रक्तपेढी बंद
By Admin | Published: February 20, 2017 02:21 AM2017-02-20T02:21:50+5:302017-02-20T02:21:50+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महिना होत नाही ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावाधाव
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महिना होत नाही तोच डागडुजीच्या नावाखाली ही रक्तपेढी बंद करण्यात आली. तब्बल दीड महिन्यापासून रक्तपेढी बंद आहे. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलच्या रक्तपेढीत धाव घ्यावी लागत आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांत जोखमीच्या शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे. यात हृदय, पोटाचे विकार, मेंदू आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या जटिल, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. रुग्णांच्या आवश्यक्तेला लक्षात घेऊन या हॉस्पिटलमध्ये २४ तास रक्तपेढी सुरू करा, असे निर्देश खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. परंतु आदेशानंतरही काही महिने अंमलबजावणी झालीच नाही. अखेर २३ नोव्हेंबर २०१६ पासून रक्तपेढीला सुरुवात झाली. यामुळे रोज किमान दोन होणाऱ्या हृदय व मेंदू शल्यक्रियेच्या रुग्णांच्या नातेवाईकांची वेळेवरची धावाधाव थांबली. महिन्यातून एक होणाऱ्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शल्यक्रियेलाही मदत झाली.
‘सुपर’ला रोज किमान आठ ते दहा रक्त पिशव्यांची गरज भासते. रक्तातील विशिष्ट घटकाचे विघटन करूनही अनेकदा रक्त संक्रमित करावे लागते. त्यासाठी शल्यक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या सूचना आणि रुग्णाची गरज पाहता हे रक्त तयार ठेवावे लागते. दुर्दैवाने सुपरच्या रक्तपेढीत रक्तातील घटक विघटन करण्याची यंत्रणाच कार्यान्वित नाही. त्यात आता डागडुजीच्या कामांमुळे रक्तपेढीच बंद आहे. त्यामुळे सुपरच्या शल्यक्रिया मेडिकलच्या रक्तपेढीवर अवलंबून आहेत.(प्रतिनिधी)
‘कम्पोनंट ब्लड बँक’साठी जागेची समस्या!
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने रक्तपेढीत ‘रक्तघटक विघटन’ (कम्पोनंट ब्लड) करण्याच्या यंत्रणेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. याला मंजुरी मिळाल्यास ‘कम्पोनंट’ रक्तपेढीच्या जागेचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन मुंबईला पाठविले जाणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीत असलेली जागा ‘कम्पोनंट ब्लड बँक’साठी उपयोगाची नाही, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
डागडुजीच्या कामामुळेच रक्तपेढी बंद
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रक्तपेढी डागडुजीच्या कामामुळे बंद ठेवण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तशा सूचना आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी मेडिकलच्या रक्तपेढीत विशेष सोय करण्यात आली आहे. या बंदच्या काळात ‘सुपर’च्या तंत्रज्ञला ‘कम्पोनंट ब्लड’चे प्रशिक्षणही दिले जात आहे. डागडुजीचे काम पूर्ण होताच पुन्हा रक्तपेढी सुरू होईल.
-डॉ. रमेश पराते
विभागप्रमुख, रक्तपेढी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल