ब्लड मोबाईल व्हॅनचे चाक थांबले
By admin | Published: May 10, 2015 02:21 AM2015-05-10T02:21:38+5:302015-05-10T02:21:38+5:30
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मिळणाऱ्या अनुदानाच्या भरवशावर रक्तसंकलन करणाऱ्या ‘ब्लड मोबाईल व्हॅन’च्या चालकाची ...
नागपूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मिळणाऱ्या अनुदानाच्या भरवशावर रक्तसंकलन करणाऱ्या ‘ब्लड मोबाईल व्हॅन’च्या चालकाची शासकीय डागा रुग्णालयात बदली करण्यात आल्याने
गेल्या १५ दिवसांपासून व्हॅन जागेवरच उभी आहे. एकेकाळी रक्तसंकलनातून आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या या व्हॅनच्या अभावाने रक्ताचा तुटवडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३० लाख लोकसंख्येच्या वर आलेल्या नागपुरात दिवसाकाठी हजार बॉटल्सही रक्त जमा होत नाही. यामुळे शासकीयपासून ते खासगी रक्तपेढ्यांना रक्त देता काय रक्त, असे म्हणण्याची वेळ येते. यातच दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रक्तटंचाई जाणवते. रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई भासत असल्यामुळे रु ग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रक्ताच्या मागणीच्या तुलनेत ५० टक्केच पुरवठा होत आहे. मेडिकलमधील रक्तसंकलन करणारी व्हॅन बंद पडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे.
मेडिकलच्या पॅथालॉजी विभागाला नॅको या संस्थेकडून एप्रिल २०१० मध्ये ही ‘व्हॅन’ मिळाली. या व्हॅनची किंमत १.३० कोटी रुपये आहे. या व्हॅनमुळे शहरच नाहीतर ग्रामीण भागातही रक्तसंकलनाचे कार्य सुरू झाले. वातानुकूलित असलेल्या या व्हॅनमध्ये एकाचवेळी चार लोक रक्तदान करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात यश मिळाले. यातून मेडिकलच्या रक्तपेढीला ‘आदर्श रक्तपेढी’चा पुरस्कारही प्राप्त झाला. रक्ताचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने (एमसॅक) ही व्हॅन बंदच पडू नये म्हणून दोन चालक दिले. दोन महिन्यांपूर्वी यातील एका चालकाचा अपघात झाला. यात त्याचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले. दुसऱ्या चालकाच्या भरवशावर व्हॅन धावत असताना, १५ दिवसांपूर्वी अचानक त्याची बदली शासकीय डागा रुग्णालयात करण्यात आली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांनी या व्हॅनच्या एका चालकाचा अपघात झाल्यानंतरही दुसऱ्या एका चालकाची जाणीवपूर्वक डागामध्ये बदली केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात, नावाडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)