बाबूजींच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
By Admin | Published: July 1, 2016 02:52 AM2016-07-01T02:52:35+5:302016-07-01T02:52:35+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर शनिवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे.
निरंतर निष्काम कर्म आणि सेवा कार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत लोकमतच्यावतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते, म्हणूनच रक्तदान सर्वदानात श्रेष्ठ आहे.
एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीतजास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषत: ‘लोकमत’चे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी व रक्तदान करणाऱ्यांनी लोकमत भवन रामदासपेठ येथे किंवा फोन नं. २४२९३५५, ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ वर संपर्क साधावा.
(प्रतिनिधी)
रक्तदात्यांसाठी भेटवस्तू व प्रमाणपत्र
कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे असते. म्हणूनच दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.