आज सहा ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:06+5:302021-07-10T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने राबविलेल्या राज्यस्तरीय ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तसंकलन मोहिमेत दिवसेंदिवस विविध संघटना जोडल्या जात आहेत. कोरोना काळातील रक्तसंकलनाची तूट भरून काढण्यासाठी राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत अनेक नागरिकांनी आपले योगदान दिले आहे. त्याच शृंखलेत शनिवारी १० जुलै रोजी नागपुरात गुरुदेव सेवाश्रम, एमएसईबी गड्डीगोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा, नाभिक युवा शक्ती ग्रुप सावनेर, टायगर ग्रुप खापा, युवा सेना कळमेश्वर व सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठीच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.
श्री गुरुदेव सेवा मंडळ
श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने श्री गुरुदेव सेवाश्रम, रमण विज्ञान केंद्र येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी असतील. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक यावले, प्रचार प्रमुख सियाराम चावके, समन्वयक घनश्याम रक्षक, सचिव विठ्ठलराव पुनसे, साहित्य विभाग प्रमुख प्रा. रामदास टेकाडे, महिला समिती प्रमुख संगीता जावळे उपस्थित राहतील.
एमएसईबी, गड्डीगोदाम
एमएसईबी, गड्डीगोदामच्यावतीने रिक्रिएशन हॉलमध्ये सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या हस्ते होईल. यावेळी कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, हेमराज ढोके, समीर टेकाडे, प्रफुल्ल लांडे, राहुल जीवतोडे, हिवरकर उपस्थित राहतील.
नाभिक युवा शक्ती, टायगर ग्रुप व नगर परिषद खापा
लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत सावनेर तालुक्यातील खापा येथील राजेंद्र हायस्कूल येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत, टायगर ग्रुप खापा, नगर परिषद खापा व नाभिक युवाशक्ती ग्रुप, खापा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय कार्यात खापा शहरातील रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खापा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे, नाभिक युवा ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल तळखंडे, टायगर ग्रुप शाखा प्रमुख संदीप गिरेपुंजे यांनी केले आहे.
अद्विका फाऊंडेशन व कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणा
लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत लोकमत वृत्तपत्र समूह, अद्विका फाऊंडेशन व कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, (दि.१०) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणा येथे सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बबनराव आव्हाळे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, मुख्याधिकारी राहुल परीहार, नगर परिषद वानाडोंगरी, प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रिया उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप जाधव अध्यक्ष, सती अनसूया माता जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव किरण काकडे, अद्विका फाऊंडेशनचे सचिव राहुल जगताप उपस्थित राहतील. हिंगणा परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
युवा सेना, कळमेश्वर
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत लोकमत व युवा सेना कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खुले नाट्य मंदिर कळमेश्वर येथे सकाळी ११ ते ४ दरम्यान हे शिबिर होईल. कळमेश्वर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत ईखार, अमित दहीकर, किशोर तुरकर, चेतन घुमडे, निखील लामसे, सचिन रघुवंशी यांनी केले आहे.
सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी
लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत लोकमत व सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय सभागृह, कामठी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बागडे, प्रमुख अतिथी म्हणून कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, जुनी कामठीचे ठाणेदार राहुल शिरे, कामठी नगर परिषदचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर, सभापती उमेश रडके, कामठी तालुका लोकमत सखी मंच संयोजिका मंगला कारेमोरे, रनाळा ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्णा साबळे, खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेश्वर कापसे, घोरपड ग्रामपंचायतच्या सरपंच तारा कडू उपस्थित राहणार आहे.
................