रक्तदान प्राणदान, आपात्काळात बांधूया एकतेची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:22+5:302021-07-05T04:06:22+5:30

- लोकमत रक्ताचं नातं : युवकांनो रक्तदानासाठी घ्या पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका हाताने देताना, दुसऱ्या हाताला ...

Blood donation, life-giving, let's build unity in an emergency | रक्तदान प्राणदान, आपात्काळात बांधूया एकतेची वज्रमूठ

रक्तदान प्राणदान, आपात्काळात बांधूया एकतेची वज्रमूठ

Next

- लोकमत रक्ताचं नातं : युवकांनो रक्तदानासाठी घ्या पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका हाताने देताना, दुसऱ्या हाताला कळू नये... असे नि:स्पृहतेने केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. रक्तदान ही अशी एक प्रक्रिया आहे, जी सर्वश्रेष्ठ परोपकाराची संधी प्रदान करते. रक्तदान केल्यानंतर अनाहुतपणे त्या दानाचा महत्तम उपयोग अजाणत्या व्यक्तीला होतो. त्यात आप्तही असू शकतात आणि ज्याला कधी बघितले नाही, असेही असू शकतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकाचे जरी प्राण वाचविता आले तरी ती आपल्या जीवनाची सर्वोत्तम सार्थकता असेल. रक्तदानाच्या माध्यमातून ही संधी प्रत्येकाला लाभली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक जीव दगावले. त्यात कुणाचे ना कुणाचे नातेवाईक, मित्रमंडळी होती. त्यावेळी रक्त संकलनाचे महत्त्व प्रत्येकाला कळले असते तर ते जीव आज तुमच्या-आमच्यासोबत असते. त्यामुळेच, ‘रक्तदान प्राणदान’ हे तत्त्व अंगीकारत वर्तमानातील आपात्काळाचा सामना करण्यासाठी एकतेची वज्रमूठ बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘रक्तदान प्राणदान’ हे महत्त्व जाणून लोकमतने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीच्या पर्वावर २ ते १५ जुलै दरम्यान राज्यस्तरीय ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम हाती घेतली आहे. यात राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. यात नागरिकांनी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करतो आहोत. सर्वसामान्य काळात १२ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला दररोज ६ ते ८ हजार युनिट रक्ताची गरज भासते. यात आजारी व्यक्ती, तत्कालीन अपघातग्रस्त व्यक्ती व विभिन्न आजारांनी ग्रस्त नियमित रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींना लाभ घेता येतो. मात्र, आजघडीला महाराष्ट्राकडे केवळ २० हजार युनिट्स रक्त शिल्लक आहे. खरे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार युनिट्सच्या जवळपास रक्त असणे गरजेचे आहे. रक्ताचा एवढा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. अशा स्थितीत सामाजिक जबाबदारीचे भान जपत नागरिकांनी, विशेषत: युवा वर्गाने राज्याचे हात मजबूत करणे गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी ‘रक्ताचं नातं’ निर्माण करण्यासाठी व ते जपण्यासाठी रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन लोकमत करत आहे.

-------------------

वाढदिवस, जयंती, पुण्यस्मरणानिमित्त करा रक्तदान

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवसाला खास बनविण्यासाठी अनेक जण पार्टी, सोहळे आयोजित करत असतात. हेच निमित्त साधून बर्थडे बॉय/गर्ल्सने पुढाकार घ्यावा. सोबतच महापुरुषांसोबतच आपल्या आप्तांची जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदानाची परोपकारी वृत्ती बळकट करण्याची गरज आहे.

-----------------

प्रथम रक्तदान करणाऱ्यांनी यावे पुढे

समाजात रक्तदानाविषयी भीतीचा टॅबू आजही दिसून येतो. रक्तदान केल्याने रक्त आटते, आजारी पडतो, रक्त पुन्हा परत येत नाही, ही भीती अवैज्ञानिक आहे. उलट रक्तदान केल्याने रक्तशुद्धी होते आणि दुसऱ्या कुणाचे तरी प्राण वाचविता येतात, ही जाणीव वृद्धिंगत करण्याची गरज आहे. त्यामुळे, ज्यांनी आजपर्यंत रक्तदान केले नाही आणि जे प्रथमच रक्तदान करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी या अभियानासह नि:संकोच सहभागी व्हावे. तरुणाईने, पोलीस बांधवांनी व इतर कर्मचाऱ्यांनीही रक्तदानासाठी पुढे यावे.

------------------

आज येथे करा रक्तदान

मेयो ब्लड बँक

लाइफलाइन ब्लड बँक

जीवन ज्योती ब्लड बँक

डागा ब्लॅड बँक

जीएमसी सुपर स्पेशालिटी ब्लड बँक

जीएमसी ब्लड बँक

हेडगेवार ब्लड बँक

जीएसके ब्लड बँक

साईनाथ ब्लड बँक

आयुष ब्लड बँक

......................

Web Title: Blood donation, life-giving, let's build unity in an emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.