लोकमतच्या रक्तदान महायज्ञाचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:44+5:302021-07-02T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणकाळात आरोग्याच्या निर्बंधांमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणकाळात आरोग्याच्या निर्बंधांमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत अनेक शस्त्रक्रिया व उपचार रखडले आहेत. ही जाण ठेवत लोकमतच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. रक्तदानाच्या या महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्व. जवाहरलाल दर्डा कला अकादमी, लोकमत भवन, नागपूर येथे होत आहे.
ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होईल.
प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ. प्रवीण दटके (विधान परिषद सदस्य), आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, लाइफलाइन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे, उन्नती फाउंडेशनचे प्रमुख अतुल कोटेचा उपस्थित राहतील.
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपातकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळविणे ही तारेवरची कसरत असते. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान देऊ शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे, डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
---------------
यांनी करावे रक्तदान
- १८ ते ६० वर्षे गटातील व्यक्ती.
- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
- लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
-दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.