क्षुल्लक कारणावरून खून; दोघांना जन्मठेप
By admin | Published: February 1, 2017 02:37 AM2017-02-01T02:37:03+5:302017-02-01T02:37:03+5:30
कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेड मार्गावरील चुंगी नाक्यानजीक केवळ क्षुल्लक कारणावरून एका
सत्र न्यायालय : उमरेड मार्गावरील चुंगी नाक्याजवळील घटना
नागपूर : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेड मार्गावरील चुंगी नाक्यानजीक केवळ क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा खून करून दुसऱ्याला जखमी करणाऱ्या दोन आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अप्पूखान ऊर्फ शफीकखान रफीकखान (२८) रा. राऊतनगर खरबी आणि मोहम्मद अय्युब शेख मोहम्मद युसूफ शेख (३१) रा. नवीन दिघोरी नाका, अशी आरोपींची नावे आहेत. राजेश सुनील लखोटे (२७), असे मृताचे नाव होते. तो खरबी मार्गावरील मानव शक्ती ले-आऊट येथील रहिवासी होता. बादल ऊर्फ बंटी प्रभाकर म्हैसकर (२४), असे याच प्रकरणातील जखमीचे नाव आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, १३ मे २०११ रोजी सायंकाळच्या वेळी या प्रकरणातील फिर्यादी अंकुश सुनील लखोटे, त्याचा लहान भाऊ राजेश लखोटे, मित्र निकुंज चौधरी, बंटी म्हैसकर आणि बंटी ऊर्फ मौसाजी हे चुंगी नाकानजीकच्या ग्रीन बिअर बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिल्यानंतर हे सर्व जण बारनजीकच्या रूपेशच्या पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेले होते. पानठेल्यावर हे सर्व जण बारवाल्याने निपचे १७० रुपये जास्त घेतले, अशी चर्चा करीत असताना पानठेल्याच्या बाजूला एका बाकावर बसलेल्या अप्पूखान याने ‘बारवालेने बराबर पैसे लिया’, असे म्हटले होते. त्यावर अंकुशने त्याला ‘समोर बघू’, असे म्हटले असता अप्पूखान याने त्याला ‘ज्यादा बात करना नही’, असे म्हटले होते. त्यावर राजेश, बंटी आणि रिंकू यांनी त्याला ‘तू ऐसा क्यू बोल रहा है’, असे म्हणताच अंकुश आणि अप्पूखान यांच्यात हाणामारी झाली होती. अप्पूखान याने अंकुशचे शर्ट फाडून बटन तोडले होते. त्यानंतर त्याने लाकडी पाटीने अंकुशवर प्रहार केले होते. त्याच वेळी अप्पूखान याने आपला साथीदार अय्युब खान याला आवाज देताच पानठेलेवाला रूपेशने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. अय्युब खान हा पंक्चरच्या दुकानातून चाकू घेऊन धावत आला होता. त्याने राजेशवर चाकूने वार करताच बंटी म्हैसकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता बंटी जखमी झाला होता. त्यानंतर अय्युब खान याने राजेशच्या पोटावर चाकूने वार केला होता. परिणामी राजेश पानठेल्याच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. त्याला अंकुश आणि बंटीने मेडिकल कॉलेज इस्पितळात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून राजेशला मृत घोषित केले होते. (प्रतिनिधी)
१४ साक्षीदार तपासले
४अंकुश लखोटे याच्या तक्रारीवर कुही पोलिसांनी १४ मे २०११ रोजी भादंविच्या ३०२, ३२४, ३२३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून १७ मे रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती. पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. भादंविच्या ३२४ कलमांतर्गतच्या गुन्ह्यातून दोन्ही आरोपींची सुटका करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील प्रशांत भांडेकर यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, सहायक फौजदार दिलीप कडू, रमेश भुसारी, प्रमोद पाटील, अरुण भुरे आणि हेड कॉन्स्टेबल विजय सांदेकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.