मनोरुग्णालयातील रुग्णाचा खूनच
By admin | Published: February 10, 2017 02:43 AM2017-02-10T02:43:12+5:302017-02-10T02:43:12+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाचा साडेचार महिन्यापूर्वी गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
साडेचार महिन्यानंतर खुलासा
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाचा साडेचार महिन्यापूर्वी गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. जयंत रत्नाकर नेरकर (४५) रा.मातानगर असे मृताचे नाव आहे. जयंत १८ आॅगस्ट रोजी रात्री बॅरेकमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाला लोकमतनेच उघडकीस आणले होते. यानंतर हिवाळी अधिवेशनातही मनोरुग्णालयातील रुग्णांच्या संशयास्पद मृत्युचे प्रकरण गाजले होते. मानकापूर पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली होती. शवविच्छेदन अहवालात नेरकर याचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर गुरुवारी रात्री मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. नेरकर सहा महिन्यांपासून मनोरुग्णालयात भर्ती झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मनोरुग्णालयात घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास नेरकरचा वाद झाला होता. यादरम्यान त्याचा गळा आवळण्यात आला असावा. मनोरुग्णालयात याप्रकरच्या अनेक घटना झाल्या आहेत. परंतु बदनामीच्या भीतीने त्या दाबल्या जातात. (प्रतिनिधी)