आॅटोचालकाची ३५० लोकांना रक्ताची मदत
By admin | Published: June 14, 2016 02:23 AM2016-06-14T02:23:31+5:302016-06-14T02:23:31+5:30
त्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते.
घनश्याम चकोलेंचा आदर्श : ग्रामीण भागात उभी केली रक्तदानाची चळवळ
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
त्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते. रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्याच्या मनात होती. स्वत: रक्त न देता मित्रांची मदत घेतली. मित्रांनी कुठलेही आढेवेढे न घेता सहज रक्त दिले. पत्नी वाचली. एक गोंडस बाळ त्याच्या कुशीत होते. मात्र डोक्यात काहूर माजला होता. ते रक्त देऊ शकतात, मी का नाही?. याच प्रश्नातून त्याने नंतर रक्तदानाची चळवळ उभी केली. त्याने आपल्या आॅटोवर स्वत:चा मोबाईल नंबर लिहून रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आवाहनच केले. आतापर्यंत ३५० लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याने रक्ताची मदत केली.
माणुसकीच्या भूमिकेतून मोठे कर्तव्य पार पाडणाऱ्या या आॅटोचालकाचे नाव घनश्याम चकोले. कामठी अजनी येथील गोदा या गावात तो राहतो. ३८ वर्षीय घनश्याम प्रवाशांना घेऊन नेहमीच नागपूर-कामठी रहदारी करीत असतो. बर्डीवर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असताना त्याला बोलते केल्यावर त्याने वरील आपबिती सांगितली. जे रुग्ण रक्ताविना तडफडत असतात, त्यावेळी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूत नसतो तर प्रत्यक्ष देवच असतो. रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या. मात्र, विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. आजही रक्तदानाला पर्याय नाही. म्हणूनच घनश्यामसारखे रक्तदाते ‘हिरो’ ठरतात.
संकोच नको म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधले
घनश्याम म्हणाला, त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत पोहचविली. स्वत: १९ वेळा रक्तदान केले. ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली. रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले. आतापर्यंत २२ शिबिरे घेतली. यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रक्तपेढ्यांना दिले. रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोहचावी म्हणून आॅटोवर मोबाईल क्रमांक लिहिला. मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधले. कुणाकडूनही कशाची मदतीची अपेक्षा न करता हे कार्य सुरू आहे. परंतु आजही रक्तदानाबद्दल विशेषत: ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे. रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत. दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास ‘रिप्लेसमेंट’ची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहनही त्याने केले.