‘रक्ताचे नाते’ आणखी घट्ट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:46+5:302021-07-16T04:07:46+5:30
नागपूर : दानात रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठमोठ्या ...
नागपूर : दानात रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते, हे माहीत असतानाही अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही. हे विचार बदलणे आवश्यक आहे. स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून ‘रक्ताचे नाते’ आणखी घट्ट करा, असे आवाहन दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी येथे केले.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी रक्तसंकलन मोहिमेंतर्गत दंदे फाऊंडेशनच्यावतीने गुरुवारी नागरिक सहकारी रुग्णालय, धरमपेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीवन ज्योती रक्तपेढीचे संचालक डॉ. रवी वानखेडे व श्री. के.आर. पांडव कॉलेज ऑफ नर्सिंग ॲण्ड हॉस्पिटलच्या प्राचार्य वीणा बोरकर उपस्थित होत्या. यावेळी दंदे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांपासून ते नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. जीवन ज्योती रक्तपेढीचे डॉ. अभिजित मानकर, रुपाली पाली, अरुण मोरांडे, किशोर खोब्रागडे यांच्यासह दंदे फाऊंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले.
-अवयवदान चळवळ व्यापक व्हावी
डॉ. वानखेडे म्हणाले, ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्याविषयी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली आहे. भारतात सर्वसामान्यांमध्ये अवयवदानाविषयी आता कुठे जनजागृती होत आहे. अवयवदानाअभावी रुग्णांचे मृत्यू थांबविण्यासठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.