क्षुल्लक वादातून निर्घृण खून
By admin | Published: June 30, 2017 02:35 AM2017-06-30T02:35:45+5:302017-06-30T02:35:45+5:30
क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले. खुनाची ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
पानवाडीतील घटना : आरोपीला घटनास्थळीच अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले. खुनाची ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानवाडी येथे बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रमेश बाजीराव ढोके (५५, रा. पानवाडी) असे मृताचे तर सिद्धार्थ अंबादास मून (४६, रा. धवड ले-आऊट, काटोल, ह.मु. पानवाडी) असे आरोपीचे नाव आहे. रमेश ढोके हा पानवाडी ग्रामपंचायतमध्ये रोजंदारी तत्त्वावर कामावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. तरीही तो कामावर येत होता आणि काम आटोपल्यानंतर तो ग्रामपंचायतच्या गोदामात रात्रीच्या वेळी झोपायचा. बुधवारी तेथे सिद्धार्थ मून आला. त्याने रमेशसोबत क्षुल्लक कारणावरून वाद घातला. त्यातूनच आरोपीने सिमेंट बेंचचा तुकडा आणि लाकडी झोडप्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रक्तबंबाळ होऊन रमेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मारहाण आणि आरडाओरड होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, रमेश हा रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी लगेच काटोल पोलिसांना सूचना केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विनायक नागुलवार हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर, पोलीस निरीक्षक दिगांबर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात काटोल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनायक नागुलवार, शेषराव राठोड तपास करीत आहेत.