नागपुरात अवैध दारू विक्रीच्या वादात खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:17 AM2018-11-22T00:17:37+5:302018-11-22T00:18:37+5:30
मित्राला चाकू खुपसून जखमी केल्याची घटना अवैध दारू विक्रीच्या वादातून झाल्याची माहिती आहे. खरा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जखमी आणि आरोपी दोघेही पोलिसांना सूचना न देता घरी परत गेले होते. वस्तीत खळबळ उडाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राला चाकू खुपसून जखमी केल्याची घटना अवैध दारू विक्रीच्या वादातून झाल्याची माहिती आहे. खरा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जखमी आणि आरोपी दोघेही पोलिसांना सूचना न देता घरी परत गेले होते. वस्तीत खळबळ उडाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्यात आली.
गेल्या १९ नोव्हेंबर रोजी रात्री सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दारोडकर चौकात दारू पिल्यानंतर झालेल्या वादात अमित राजू यादव (२८) रा. कुंभारपुरा याला त्याच्यात वस्तीत राहणारा प्रवीण दिलीप जाधव याने छातीवर चाकूने वार करून जखमी केले होते. घटनेनंतर दोघेही थेट घरी पोहोचले. या घटनेने वस्तीत खळबळ उडाली. अमितचे कुटुंबीय प्रवीणला मारहाण करू लागले. यानंतर प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांनीच जखमी अमितला मेयो रुग्णालयात दाखल केले होते. विचारपूस करताना दोघांनीही आपल्या बयानात १०० रुपयासाठी वाद झाल्याचे सांगितले होते. प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार अमितने दारू खरेदी करण्यासाठी १०० रुपये दिले होते. दारू पिल्यानंतर अमित पैसे परत मागू लागला. त्यामुळे त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने अमितवर हल्ला केला.
परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादाचे मुख्य कारण अवैध दारू विक्रीचा वाद आहे. अमित आणि प्रवीण लाकडीपूल जवळील कुंभारपुरा येथे राहतात. ते अवैध दारूच्या विक्रीशी जुळलेले आहेत. प्रवीण दारूच्या दुकानात काम करतो. तो अमितच्या मदतीने अवैध दारू जमा करून बंदीच्या दिवशी त्याची विक्री करतो. दारूबंदीच्या दिवशी कुंभारपुरा येथे दारूड्यांची गर्दी असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूच्या विक्रीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या वेळीसुद्धा दोघेही पैशावरूनच एकमेकांशी भांडू लागले. खरा प्रकार उघडकीस येईल, या भीतीने त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे ते थेट घरी परत गेले.
सूत्रानुसार अमित आणि प्रवीणच्या या धंद्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे नेहमी असते. सक्तीने विचारपूस केल्यास त्यांना आश्रय देणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचीही नावे समोर येऊ शकतात.