लिव्ह इन रिलेशनशिपचा रक्तरंजित शेवट; प्रियकराचा प्रेयसीवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 12:29 PM2021-06-30T12:29:51+5:302021-06-30T12:32:42+5:30
Nagpur News दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलातील वाद टोकाला गेला. त्यामुळे मंगळवारी दुपारी प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चाकूने गळा कापून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलातील वाद टोकाला गेला. त्यामुळे मंगळवारी दुपारी प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा चाकूने गळा कापून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मेडिकल चाैकाजवळच्या उंटखाना परिसरात ही थरारक घटना घडली.
आरोपीचे नाव निखिल दमके (वय २३) असून, जखमी तरुणी २० वर्षांची आहे. ते एकाच वस्तीत राहत होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे एका मंदिरात दोघांनी एकमेकांना हार घालून रामेश्वरीत भाड्याची रूम घेतली. तेथे ते पती-पत्नीसारखे राहत होते. निखिल एका पानटपरीवर काम करीत होता. कोरोनामुळे त्याचे काम सुटले, नंतर या दोघांमध्ये खटके उडू लागले. वाद टोकाला गेल्याने युवती तिच्या माहेरी निघून गेली. ती परत येण्याचे नाव घेत नसल्याने निखिलने तिला आत्महत्येची धमकी देऊन एकदा भेटीला येण्याची जिद्द केली.
त्यानुसार मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास ती उंटखाना परिसरात त्याला भेटायला गेली. त्याने तिला सोबत चलण्याचा हट्ट धरला. त्याचा आधीचा अनुभव कटू असल्याने त्याच्यासोबत राहण्यास तरुणीने नकार दिला. ती ऐकत नसल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि आरोपी निखिलने त्याच्या जवळचा चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर फिरवला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे तेथे मोठ्या संख्येत बघे जमले. माहिती कळताच ठाणेदार मुकुंद साळुंखे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. दरम्यान, जखमी तरुणीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. ---
आरोपी गजाआड
घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर आरोपी निखिल इकडेतिकडे लपू लागला. तर इमामवाडा पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. अखेर रात्री ९ च्या सुमारास तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.
म्हणून घरच्यांचा विरोध
आरोपी निखिलचे वर्तन आधीच लक्षात आल्याने तरुणीच्या घरच्यांनी तिला त्याच्यासोबत लग्न करण्यास मनाई केली होती. मात्र, घरच्यांचा विरोध डावलून ती पत्नीसारखी त्याच्यासोबत राहिली. तो चारित्र्यावर संशय घेत तिला सारखा छळू लागला. त्यामुळे ती माहेरी परतली. आता ११ वीला प्रवेश मिळवून शिकायचे आणि नोकरी मिळवायची, असा तिने निर्धार केला होता.
---