खुनी पतंगबाज अन्‌ निगरगट्ट प्रशासन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:21+5:302021-01-15T04:08:21+5:30

आपला मुलगा दुचाकी घेऊन घराबाहेर पडताना पाहून आज प्रत्येक आईचे काळीज धास्तावलेले आहे; प्रत्येक वडीलही दहशतीत आहे ! कुणी ...

Bloody kite fly and Nigargat administration! | खुनी पतंगबाज अन्‌ निगरगट्ट प्रशासन !

खुनी पतंगबाज अन्‌ निगरगट्ट प्रशासन !

Next

आपला मुलगा दुचाकी घेऊन घराबाहेर पडताना पाहून आज प्रत्येक आईचे काळीज धास्तावलेले आहे; प्रत्येक वडीलही दहशतीत आहे ! कुणी सांगावे, चुकून कुठून तरी नायलॉन मांजा आला आणि आपल्या मुलाचा गळा कापला तर...! अवघे २० वर्षांचे वय असलेल्या प्रणव या युवक इंजिनिअरच्या बाबतीत नेमके हेच तर घडले. रस्त्याने जाताना त्याचा गळा मांजाने कापला गेला. मृत्यूने डाव साधला. गळा कापण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीही चार वेळा असे प्रसंग घडले. मात्र नशिबाची दोरी बलवत्तर म्हणायची, केवळ जखमेवर निभावले. आजही नायलॉन मांजा हवेमध्ये तरंगतोय. कुठे, कधी एखादा प्रणव त्यात पुन्हा अडकेल, सांगता येत नाही? ! म्हणूनच आज प्रत्येक आई प्रार्थना करते, माझ्या मुलाला मांजापासून वाचव, सुखरूप घरी परतू दे ! प्रणवच्या मृत्यूची बातमी ज्याने वाचली, ऐकली, पाहिली, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू नक्कीच दाटले असणार. काळजाचा ठोका चुकला असणार. रागाने रक्तही उसळले असणार ! सर्वांचा एकच प्रश्न आहे, या घटनेला जबाबदार कोण? दुसऱ्यांचा पतंग काटण्यासाठी आपल्या पतंगाला नायलॉन मांजा लावून आनंद घेत बसला असेल, तोच ! कोण? आहे तो ? कुठल्या छतावरून हा खुनी मांजा पतंगासोबत अवकाशात उडला? हे प्रश्न पोलिसांच्या तपासाचा भाग आहेत. ते उत्तरेही शोधतील. पण, या तरुणाच्या अकाली मृत्यूला स्थानिक प्रशासन जबाबदार नाही? का? नक्कीच आहे. मात्र निर्ढावलेपणाची आणि बेपर्वाईची पुटं त्यावर चढली आहेत. म्हणूनच कदाचित ही घटना संवेदनशून्यतेने प्रशासन पाहत असावे. नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना ज्या दिवशी घडली, त्याच दिवशी आकाश-पाताळ एक व्हायला हवे होते. मात्र ना महापौरांच्या मनाला वेदना झाल्या, ना कुण्या नगरसेवकाला कळवळा आला ! मनपा कर्तव्यशून्य झाली, असाच अर्थ आता यातून काढाला, तर कदाचित चुकीचे ठरणार नाही. मनपाने फक्त सांगण्यापुरते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एक शोधपथक तयार केले. या पथकाची काही जबाबदारी आहे की नाही? नायलॉन मांजा विक्रेत्यांपर्यंत पोहोचून त्यांना पकडणार कोण? दंडीत करणार कोण?

दुसरे असे की, शहरात नायलॉन मांजा विकला जातोय, हे मनपाला माहीत कसे नाहीत? तो कुठे, कसा विकला जातो, हे कळू नये? वॉर्डा-वॉर्डातले नगरसेवक करतात तरी काय? आपल्या प्रभागात नाययाॅन मांजा विकला जाणार नाही, याची जबाबदारी ते काय? घेऊ शकत नाहीत? कोण होता प्रणय ! तो तर बिचारा एका सामान्य कुटुंबातील इलेक्ट्रीशियनचा मुलगा होता. कुण्या राजकीय नेत्याचा किंवा गर्भश्रीमंत माणसाचा मुलगा थोडीच होता ! तसे असते तर मांजा विकणाऱ्याचे आणि पतंग उडविणाऱ्याचे काही खरे नव्हते. काय? करणार? दिवसच तसे आलेत आणि हो, आपल्यापैकीही कोणीच याबद्दल आवाज काढायला तयार नाही. काय, आपण कधी नायलाॅन मांजाविरुद्ध महापौरांना पत्र पाठविले आहे? कधी यासंदर्भात मेल तरी केला आहे ? नसणारच ! जरा विचार करा, मकरसंक्रांतीला जेव्हा हजारो पतंग आकाशात उडत असतील, तेव्हा प्रणवच्या वडिलांच्या व बहिणीच्या संंतापदग्ध आणि रडून कोरड्या झालेल्या डोळ्यांमध्ये मृत्यूचे तांडव कसे बेफाम झालेले असेल !

Web Title: Bloody kite fly and Nigargat administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.