रक्तरंजित थरार; नागपुरात विद्यार्थ्याची भर रस्त्यावर हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 10:36 PM2022-09-16T22:36:43+5:302022-09-16T22:37:53+5:30

Nagpur News महाविद्यालयातील वादातून एका विद्यार्थ्याची सेमिनरी हिल्स परिसरात भर रस्त्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. तर त्याच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला.

bloody thrill; Student killed on road in Nagpur | रक्तरंजित थरार; नागपुरात विद्यार्थ्याची भर रस्त्यावर हत्या

रक्तरंजित थरार; नागपुरात विद्यार्थ्याची भर रस्त्यावर हत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे मृतकाच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्लाशुल्लक वादातून पाच विद्यार्थ्यांकडूनच हल्ला

नागपूर : महाविद्यालयातील वादातून एका विद्यार्थ्याची सेमिनरी हिल्स परिसरात भर रस्त्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. तर त्याच्या मित्रावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला व त्याची प्रकृतीदेखील गंभीर आहे. हल्ला करणारेदेखील विद्यार्थीच असल्याने या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याचे वाटत असल्याने त्यांची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाही.

हर्ष डांगे (२२, साईनगर,वाडी) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो वाडीतील महाविद्यालयातील विद्यार्थी होता, तर अंकित कसर (२०, आडे ले आऊट) हा जखमी झाला असून तो जी.एच.रायसोनी पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आणि अनिकेत रायसोनी महाविद्यालयाजवळ दुपारच्या सुमारास गेले होते. तेथे दिपांशू पंडीत (१९, अजनी) हा विद्यार्थीदेखील उभा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये लहानशा गोष्टीवरून वाद झाला. दिपांशूचे मित्र जमू शकतात ही बाब लक्षात घेता हर्ष व अनिकेत तेथून दुचाकीने निघून सेमिनरी हिल्स परिसरात पोहोचले. तेथे ते बोलत असतानाच दिपांशू व त्याचे साथीदार पोहोचले. हर्ष काही बोलण्याच्या अगोदरच त्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यात तो गंभीर जखमी झाला. अनिकेतने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावरदेखील आरोपींना वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहत आरोपी पळून गेले. परिसरातील लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे हर्षचा मृत्यू झाला. अनिकेत गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीदेखील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहोचले. चौकशी केली असता दिपांशू व त्याच्या मित्रांचा यात सहभाग असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून पाच आरोपींना ताब्यात घेतले.

नेमक्या कारणाचा शोध सुरू

दरम्यान, या हत्येमागचे नेमके कारण काय आहे यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यात फार अगोदरपासून वाद होता का या दिशेनेदेखील तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीशी निगडीत कारणावरून वाद झाला व त्यात हल्ला झाला. आरोपींकडून गैरसमजातून हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे.

आरोपी अल्पवयीन की दिशाभूल ?

पोलिसांनी आरोपींमधील काही जण अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. दिपांशूनेदेखील त्याचे वय १७ वर्ष असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तो तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असल्याने तो दिशाभूल करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इतर आरोपी वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. त्यांच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल.

Web Title: bloody thrill; Student killed on road in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.