चुकीच्या माणसांना झोडपून काढा!
By admin | Published: May 15, 2016 02:29 AM2016-05-15T02:29:50+5:302016-05-15T02:29:50+5:30
समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.
मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश : कायद्याची दहशत निर्माण करा
कामठी : समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी शहराची बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी चुकीच्या माणसांना झोडपून काढावे. सोबतच समाजातील चांगल्या व्यक्तींची सदैव पाठराखण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कामठी येथे शनिवारी सकाळी आयोजित हस्तांतरण सोहळ्यात कामठी, कामठी जुनी व हिंगणा पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
नागपूर पोलीस आयुक्तांनी चार महिन्यांत शहरातील २५ टक्क्यांपेक्षा अधिक गुन्हेगारी संपविली आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर, समाजात कायद्याची दहशत निर्माण होऊ शकते. आम्ही सार्वजनिक जीवनात असतो. आमच्या सोबत कुणीही फोटो काढतो. पण पोलिसांनी गुन्हेगार ओळखावे आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यावे. दुसरीकडे, चुकीच्या लोकांना कायद्याचा आधार घेत ठोकून काढावे. गृह विभागाचे काम अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. नागपूरप्रमाणे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्यास सरकार यशस्वी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांनी नागपूर शहर पोलिसांचे अभिनंदन केले.
नागपूर शहरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. चालू वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण नागपूर शहर ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यां’च्या निगराणीखाली येईल. त्यामुळे पोलिसांना त्यांचे तपास कार्य सुकर होणार आहे. हल्ली पोलीस कर्मचारी विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यांच्या या समस्या सोडविण्यावर आपला विशेष भर असल्याने त्यांनी आवर्जून सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नाही
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पूर्वी राजकीय हस्तक्षेप केला जायचा. त्यामुळे अधिकाऱ्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळायचे. यातून भ्रष्टाचार वाढीला लागला होता. आता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार केल्या जातील. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतल्या जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
डब्बा व्यापाऱ्यांवरील कारवाईचे स्वागत
रोखे खरेदी-विक्रीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी करणाऱ्या १३ डब्बा व्यापाऱ्यांवर कारवाई करीत नागपूर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, डब्बा व्यापाऱ्यांचे मुंबई कनेक्शन असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सट्टेबाजीत सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे स्वागत केले.