बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच : १२ वीच्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:46 PM2021-04-01T22:46:03+5:302021-04-01T22:47:18+5:30
Board exams on time राज्य शिक्षण मंडळातर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ओळखपत्र ३ एप्रिल रोजी जारी केले जाईल. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातून आपापले ओळखपत्र (आयकार्ड) घ्यावे लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ओळखपत्र ३ एप्रिल रोजी जारी केले जाईल. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातून आपापले ओळखपत्र (आयकार्ड) घ्यावे लागेल. यासंदर्भात बोर्डाने महाविद्यालयांना पत्रसुद्धा जारी केले आहे. या निर्णयामुळे आता १० वी व १२ वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच होतील. कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात कोविड संक्रमणाची परिस्थिती पाहता १० वी व १२ वीच्या परीक्षा स्थगित कराव्या लागतील, असे मानले जात होते. कोरोना संक्रमणामुळे नागपूरसोबतच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक आदी जिल्ह्यातही सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे काही पालक संघटनांनी बोर्डाकडे परिस्थितीचा आढावा घेऊनच परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतु बोर्डाचे आयकार्ड जारी झाल्यामुळे आता परीक्षा वेळेवरच होतील, हे स्पष्ट झाले आहे. आयकार्ड डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट देण्यात यावी, असे आदेशही बोर्डाने महाविद्यालयांना दिले आहेत. आता हे महाविद्यालयांवर अवलंबून आहे की ते विद्यार्थ्यांना आयकार्ड कधी देतील. परंतु परीक्षेपूर्वी आयकार्ड देण्याच्या सूचना आहेत. यासंदर्भात नागपूर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेणे अतिशय कठीण आहे. कारण परीक्षेत एका विभागातील दोन ते अडीच लाख विद्यार्थी सहभागी होत असतात. परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांची तयारी करावी लागते. बोर्ड परीक्षा स्थगित झाल्याने किंवा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडेल. अनावश्यक परीक्षेचा तणाव वाढेल. परीक्षा सुरू होईपर्यंत कोरोनाचे संक्रमण बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेले असेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.