दहा वर्षापासून बोर्डाला अध्यक्षाची प्रतीक्षा : राज्य शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:30 AM2020-10-18T00:30:19+5:302020-10-18T00:32:11+5:30
Education Board, without Chairman, Nagpur News राज्य शिक्षण मंडळ नागपूर विभागीय कार्यालयासोबत सावत्र व्यवहार करीत आहे. म्हणूनच १० वर्षापासून बोर्डाच्या अध्यक्षपदावर कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली नाही. कधी या पदावर विभागीय शिक्षण उपसंचालक तर कधी बोर्डाच्या विभागीय सचिवांनी प्रभारी म्हणून कार्य केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळ नागपूर विभागीय कार्यालयासोबत सावत्र व्यवहार करीत आहे. म्हणूनच १० वर्षापासून बोर्डाच्या अध्यक्षपदावर कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली नाही. कधी या पदावर विभागीय शिक्षण उपसंचालक तर कधी बोर्डाच्या विभागीय सचिवांनी प्रभारी म्हणून कार्य केले आहे.
गेल्या तीन वर्षापासून बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे अध्यक्षाचा प्रभार सांभाळत आहे. लवकरच त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यानंतर पुन्हा अध्यक्ष व सचिव हे दोन्ही पद रिक्त होणार आहे. या पदांवर आतापर्यंत कुणाची नियुक्ती करण्यात आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार देशपांडे यांच्या निवृत्तीनंतर या दोन्ही पदावर स्थायी नियुक्ती न करता शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे अध्यक्षाचा तर विभागीय सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येणार आहे.
बोरकर यांच्यानंतर बोर्डाला कायम अध्यक्षच मिळाला नाही
२०१० मध्ये नागपूर बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण बोरकर होते. त्यांची बदली बालभारतीच्या संचालकपदी झाल्याने, त्यानंतर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमरावती बोर्डाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर शिक्षण उपसंचालक पारधी यांनीही जबाबदारी सांभाळली. परंतु स्थायी नियुक्ती कुणालाही दिली नाही.
नागपूरला येण्यास अधिकाऱ्यांचा नकार
सूत्रांच्या मते नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून अधिकारी येण्याच्या मानसिकतेत नाही. बोरकर यांच्या बदलीनंतर बोर्डाच्या पुणे कार्यालयातील तत्कालीन सचिव यांना अध्यक्ष बनविण्यात आले होते. परंतु त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांकडून नागपूरसाठी मिळणारा नकार याच कारणाने अध्यक्षपद रिक्त आहे.