अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० क्रिकेट स्पर्धेत बोर्ड एकादशचा एका धावेने विजय
By जितेंद्र ढवळे | Published: December 26, 2023 09:43 PM2023-12-26T21:43:16+5:302023-12-26T21:45:15+5:30
चौधरी चरणसिंह हरयाणा कृषी विद्यापीठ संघाला केलं पराभूत
जितेंद्र ढवळे, नागपूर: शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० 'कुलगुरू चषक' क्रिकेट स्पर्धेस मंगळवार (दि. २६) पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने चौधरी चरणसिंह हरयाणा कृषी विद्यापीठ संघाला एका धावेने पराभूत करीत विजय प्राप्त केला.
सक्करदरा येथील श्री बिंझाणीनगर महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने २० शतकांत ९ बाद २१५ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना हरयाणा कृषी विद्यापीठाच्या संघाने ५ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बोर्ड एकादश संघातील नरेंदर शिलक याने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २१ चेंडू ५७ धावा काढल्या; तर तरुणनेदेखील साथ देत ३३ चेंडूंत ५७ धावा काढल्या.
हरयाणा कृषी विद्यापीठाच्या डॉ. विनय अहलावत याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या धावांचा पाठलाग करताना हरयाणा कृषी विद्यापीठ हिसारच्या संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. दीपक कुमार यांनी ३१ चेंडूंत ४ चौकार २ षटकारांसह एकूण ५७ धावा काढल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्यातील सस्पेन्स कायम होता. अखेर एका धावेने बोर्ड एकादश संघाने हा सामना जिंकला. हिस्सार विद्यापीठाचे डॉ. विनय अहलावत यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला.