धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2023 10:00 PM2023-02-07T22:00:58+5:302023-02-07T22:01:25+5:30

Nagpur News बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

Boarding a running train was desperate; The time has come on Mulindekhat woman | धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप

धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप

Next
ठळक मुद्देदोन्ही मुलींची प्रकृती बिघडली


नागपूर : बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

गायत्री स्वामी विवेकानंद पांडे (४५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होत्या. गायत्री यांचे पती बंगळुरू येथे स्टेट बँकेत नोकरी करतात. त्यांना दोन मुली आहेत. या मुलींसह गायत्री त्यांच्या पतीकडे काही दिवसांपासून मुक्कामी होत्या. गावाला परत जाण्यासाठी त्या ट्रेन क्रमांक ०६५०९ बंगळुरू दानापूर हमसफर एक्स्प्रेसमध्ये बसल्या. गायत्री यांच्या दोन मुलीही सोबत होत्या. नागपूर स्थानकावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही गाडी आली. मुलींना नाश्ता खरेदी करण्यासाठी गायत्री फलाट क्रमांक एकवर उतरल्या. सकाळी १०:१५ च्या सुमारास ही गाडी पुढे जायला निघाली. त्यामुळे घाईगडबडीत गायत्री यांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दाराची कडी (हॅण्डल) पकडली असतानाच रेल्वेगाडीने वेग धरल्यामुळे रेल्वेचा डबा आणि फलाटाच्या फटीत पांडे यांचे दोन्ही पाय आल्याने त्या चिरडत गेल्या. या थरारक अपघाताने अनेकांच्या अंगावर शहारे आले. डोळ्यादेखत आई रेल्वेगाडीखाली चिरडली गेल्याने पांडे यांच्या दोन्ही मुलींवर जोरदार मानसिक आघात झाला. त्या आक्रोश करू लागल्या.

प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वेगाडी थांबवली. त्यानंतर पांडे यांचा मृतदेह काढून तो मेयोत पाठविण्यात आला. या घटनेची सूचना पांडे यांच्या पतीला देण्यात आली. ते विमानाने दुपारी नागपुरात पोहोचले. त्यानंतर सायंकाळी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पांडे ॲम्ब्युलन्सने नालंदाकडे रवाना झाले.

विलंबाने केला घात

अनेक प्रवासी रेल्वेगाडी सुटेपर्यंत फलाटावर थांबतात आणि गाडी सुटल्यानंतर धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यात काही क्षणांचा जरी विलंब झाला तर तो जीवघेणा ठरतो. गायत्री पांडे यांच्या बाबतीतही असेच झाले. गाडी सुटली अन् ती पकडण्यासाठी त्या धावू लागल्या. मात्र, त्यांचे वजन काहीसे जास्त असल्याने त्यांचा श्वास भरून आला. अशातही त्यांनी गाडीच्या दाराची कडी पकडली अन् त्यांचा घात झाला.

-----

Web Title: Boarding a running train was desperate; The time has come on Mulindekhat woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.