बोर्डाचे मिशन बारावी

By admin | Published: February 28, 2017 01:58 AM2017-02-28T01:58:15+5:302017-02-28T01:58:15+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

Board's Board XII | बोर्डाचे मिशन बारावी

बोर्डाचे मिशन बारावी

Next

बारावी परीक्षा : विभागातून १ लाख ८० हजार विद्यार्थी बसणार
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. नागपूर विभागातून सुमारे १ लाख ८० हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दरम्यान मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील ‘कॉपीमुक्त’ अभियानावर भर दिला जाणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.
नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ८० हजार ५२२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यातील ११७६ शाळांसाठी ४३६ केंद्रे स्थापण्यात आली आहेत. परीक्षांसाठी सर्व तयारी झाली असून परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका पाठविण्याचे कामदेखील जवळपास पूर्णत्वास आले आहे. त्याचप्रमाणे सर्व परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)

७० हून अधिक भरारी पथके राहणार तैनात
बारावीच्या परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत याकरिता मंडळाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके राहणार आहेत. याशिवाय विशेष पथके मिळून ७० हून अधिक भरारी पथके विभागस्तरावर तैनात राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शिक्षणाधिकारी, महसूल विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अशा निरनिराळ्या पथकांचा यात समावेश असेल.

विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवर ताण असतो. सोबतच पालकदेखील तणावातच असतात. अशा स्थितीत मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंडळाने समुपदेशनाची सोय केली आहे. ९९२२४५३२३५, ९६६५१९२१५६ , ९७६३६६७४१६, ९४०३३५८९९८, ८०८७८००१५५, ९४२२०५३३९१, ९८९००५४५१८ या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क करू शकणार आहेत.

शाळांमध्ये तयारी पूर्ण
बारावीच्या परीक्षेसाठी ज्या शाळांमध्ये केंद्र ठेवण्यात आले आहे तेथे जवळपास सर्वच तयारी बुधवारी पूर्ण झाली. उपराजधानीतील सर्वच महत्त्वाच्या केंद्रांची पाहणी केली असता शाळांधील प्राचार्य व केंद्रप्रमुख स्वत: जातीने उपस्थित राहून सर्व व्यवस्था सांभाळत असल्याचे दिसून आले. शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात येत होते. पिण्याचे पाणी, बेंच, वर्गखोल्या, पंखे इत्यादी सुविधा योग्य आहेत की नाहीत याचीदेखील तपासणी करण्यात आली. विभागीय मंडळाचे अधिकारी व समन्वयक सातत्याने केंद्रप्रमुखांच्या संपर्कात होते.

देवा, मला पास कर!
आज शिक्षणव्यवस्था कितीही ‘हायटेक’ झाली असली तरी परीक्षेला जाण्याअगोदर देवदेवता व मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद हमखास घेतल्या जातात. वर्षभर केलेल्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळावे अशी प्रार्थना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज नागपुरातील निरनिराळ््या मंदिरांमध्ये हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिरांमध्ये विद्यार्थी व पालकांची उपस्थिती दिसून येत होती.

Web Title: Board's Board XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.