बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांड : ठिकठिकाणी छापामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:34 AM2019-05-04T00:34:54+5:302019-05-04T00:35:33+5:30
ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.
अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
कोट्यवधींच्या मालमत्तेला अडवून ठेवणाऱ्या बॉबी माकण यांचे गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपींनी अपहरण केले. रविवारी २८ एप्रिलच्या सकाळी माकण यांचा मृतदेह कोंढाळीजवळ एका पुलाच्या खाली सापडला. हत्येनंतर त्यांच्या चेहºयावर आरोपींनी अॅसिड टाकल्यामुळे बॉबीचा चेहरा पुरता विद्रूप झाला होता. बॉबीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून प्रारंभी मिसिंगची नोंद करणाºया जरीपटका पोलिसांनी रविवारी या प्रकरणात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची सुमारे १० पथके सहा दिवसांपासून रात्रंदिवस शोधाशोध करीत आहेत. या ६ दिवसांत पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पवन मोर्यानी, लिटिल सरदार, मंजित वाडे, मिकी याच्यासह डझनभर आरोपींची चौकशी केली. दुसरीकडे लिटिलचा साथीदार सिटू यालाही पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अन्य काही गुन्हेगाराचींही पोलिसांनी चौकशी केली. ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री एका गॅरेजमधून जप्त केली. गुन्ह्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी ती गॅरेजमध्ये पाठविण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे तसेच आणखी काही पुरावे पोलिसांनी मिळवले आहेत. सहा दिवसांच्या चौकशीतून एक एक कडी जुळवित पोलिसांनी पुराव्यांची साखळी जोडण्याचे प्रयत्न चालविले आहे. ज्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यातील काहींविरुद्ध पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून, त्याच आधारे पोलीस ठिकठिकाणी छापामारी करीत आहेत.
---
पोलीस पथक मुंबईत
मुंबईतही एका आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथक पोहचले असून, तो हाती आल्यानंतरच पोलीस या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा दावा एका अधिकाºयाने केला आहे.